Breaking News

हजारो बूथ सदस्यांनी केला निर्धार, मताधिक्य करूया एक लाखाच्या पार! बूथ कार्यकर्ते हीच भाजपची खरी ताकद शालेय शिक्षणमंत्री आशिष शेलार यांचे प्रतिपादन; बूथ कार्यकर्ता संमेलनास अभूतपूर्व प्रतिसाद

पनवेल : प्रतिनिधी

बूथ कार्यकर्ते हीच भारतीय जनता पक्षाची खरी ताकद आहे. पनवेलमधील आजचे हे राज्यातील सगळ्यात मोठे संमेलन पाहिल्यावर आमदार प्रशांत ठाकूर विक्रमी मतांनी विजयी होतील, असा विश्वास राज्याचे शालेय शिक्षणमंत्री आणि भाजपची मुलूखमैदान तोफ आशिष शेलार यांनी रविवारी (दि. 18) टाळ्यांच्या कडकडाटात व्यक्त केला. ते बूथ कार्यकर्ता संमेलनात बोलत होते. या वेळी तब्बल आठ हजार 700 कार्यकर्ते उपस्थित होते. 

पनवेल विधानसभा बूथ कार्यकर्ता संमेलन खांदा कॉलनीतील सीकेटी महाविद्यालयाच्या मैदानात अभूतपूर्व उत्साहात झाले. या संमेलनास शिक्षणमंत्री आशिष शेलार यांच्यासह माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, सिडकोचे अध्यक्ष तथा भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, कोकण म्हाडाचे सभापती  बाळासाहेब पाटील, महापौर डॉ. कविता चौतमोल, भाजप जिल्हा सरचिटणीस व जेएनपीटीचे विश्वस्त महेश बालदी, श्रीनंद पटवर्धन, उपाध्यक्ष लक्ष्मणशेठ पाटील, प्रवक्ते वाय. टी. देशमुख, तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, शहर अध्यक्ष जयंत पगडे, विस्तारक अविनाश कोळी, महिला मोर्चा जिल्हा अध्यक्ष कल्पना राऊत, तालुका अध्यक्षा रत्नप्रभा घरत, शहर अध्यक्षा मुग्धा लोंढे, उपमहापौर विक्रांत पाटील, सभागृह नेते परेश ठाकूर, आजी-माजी नगरसेवक, नगरसेविका, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, पदाधिकारी आणि हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

या वेळी राज्याचे शालेय शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी शेकाप पुढार्‍यांचा आपल्या खास शैलीत समाचार घेतला. अलिबागच्या पाटलांपेक्षा पनवेलचे ठाकूर बापमाणूस निघाले असल्याने आमदार प्रशांत ठाकूर विक्रमी मतांनी निवडून येतील, अशी खात्री मंत्री शेलार यांनी व्यक्त केली. या वेळी त्यांनी आपण असे म्हटल्याने अलिबागवाले ईव्हीएमकडे बोट दाखवतील, अशी टिपण्णी करून इतर पक्षांच्या मदतीने निवडणूक लढवायच्या शेकापच्या पद्धतीवर टीका केली.

मंत्री आशिष शेलार यांनी आमदार प्रशांत ठाकूर कधीही आक्रस्ताळेपणा करताना दिसत नाहीत. भारतीय जनता पक्षाच्या तालमीत तयार झालेल्या कार्यकर्त्यापेक्षा जास्तच डोक्यावर बर्फ, जिभेवर साखर आणि पायाला भिंगरी लावून फिरताना दिसतात, अशा शब्दांत त्यांचे कौतुक केले. शासनाने केलेल्या कामाची माहिती मतदारांना देऊन प्रत्येक बूथ कार्यकर्त्याने त्यांच्यासाठी मतांची झोळी घेऊन जायचे आवाहनही ना. शेलार यांनी केले. आज येथे माजी नगरसेविका नाझ हाफिज यांच्यासह मुस्लिम महिला आणि बंधूंनी मोठ्या संख्येने केलेला भाजपप्रवेश काश्मीरमधील कलम 370 रद्द करण्याचा निर्णय मुस्लिम समाजालाही पटलेला आहे याची साक्ष असल्याचे मंत्रिमहोदयांनी आवर्जून नमूद केले. 

लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी आपल्या भाषणात काश्मीरचा प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्याप्रमाणे सोडवला, त्यामुळे मिळालेला विश्वास विधानसभेच्या वेळी आणखी मजबूत करू या, असे आवाहन कार्यकर्त्यांना केले. या वेळी त्यांनी सिडकोने शिवाजी पार्कसारखे मैदान बनवण्यासाठी खारकोपर रेल्वेस्थानकाजवळ जागा द्यावी, अशी मागणी केली.

आमदार प्रशांत ठाकूर यांनी आज पहिल्यांदा विधानसभा मतदारसंघातील सगळे बूथ कार्यकर्ते एकत्र आले असल्याने लोकसभेला मित्रपक्षाच्या उमेदवाराला या विधानसभा मतदारसंघातून 54 हजार मतांची आघाडी मिळवून दिल्याबद्दल सगळ्यांचे आभार मानून येणार्‍या विधानसभा निवडणुकीसाठी आपण सज्ज होत आहोत. पालकमंत्र्यांच्या सहकार्याने शासनाच्या योजना खेड्यापाड्यातील जनतेपर्यंत कार्यकर्ते पोहोचवत आहेत, असे सांगितले. भाजप हा जनतेच्या अडीअडचणीला उभा राहणारा पक्ष असल्याने त्याचा आपल्याला अभिमान वाटतो, असेही ते म्हणाले.

या बूथ कार्यकर्ता संमेलनात शेकाप, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांचे मान्यवरांनी स्वागत केले.

(पक्षप्रवेशाचे सविस्तर वृत्त पान 2 वर..)

कार्यकर्त्यांनी दिलेल्या शब्दाचा

रास्त अभिमान : रामशेठ ठाकूर

लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी आपण शेकाप आणि काँग्रेस पक्षात गेलो त्यावेळचे अनुभव सांगून भाजपमध्ये आल्यावर पक्षाचा आलेला अनुभव वेगळा असून, बूथ कार्यकर्त्यांनी सगळ्यांना बरोबर घेऊन काम केल्यास त्याचा फायदा होईल, असे सांगितले. विधानसभेला एक लाखापेक्षा जास्त मतांची आघाडी घ्यायची आहे, या कार्यकर्त्यांनी दिलेल्या शब्दाचा रास्त अभिमान असल्याचेही ते म्हणाले.

भाजप हा शब्द पाळणारा

पक्ष : आमदार प्रशांत ठाकूर

आमदार प्रशांत ठाकूर यांनी भाजप हा शब्द पाळणारा पक्ष आहे. पक्षाने खारघरचा टोल रद्द करण्याचा आणि पनवेल महापालिका करण्याचा शब्द पाळला असल्याचे सांगून रुग्णालय, पूल, रस्ते, प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या अशी इतर अनेक उदाहरणे दिली. पनवेल तालुक्यात भाजप कार्यकर्त्यांमुळे एक नंबरवर असल्याचे सांगून त्यांनी पक्ष आणखी बळकट करण्याचा निर्धार व्यक्त केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काश्मीरचे कलम 370 रद्द करून विधानसभा निवडणुकीसाठी रोड मॅप तयार केला आहे. भाजप सरकारच्या विकासरूपी धरणातील ऊर्जायुक्त वीज खेड्यापाड्यातील घराघरांत पोहोचवण्यासाठी आपण सगळ्यांनी विद्युत तारेचे काम केले, तर विरोधी पक्ष औषधालाही शिल्लक राहणार नाही.

-बाळासाहेब पाटील, सभापती,

कोकण म्हाडा महामंडळ

Check Also

‘प्रेम नगर’ है यह अपना….

हिंदी चित्रपटाने बायस्कोपपासून ओटीटीपर्यंत, सोळा एमएमपासून सत्तर एम.एम, सिनेमास्कोपपर्यंत, रस्त्यावरच्या पोस्टरपासून ते डिजिटल युगापर्यंत, मोनो …

Leave a Reply