रोहे ः प्रतिनिधी
शहरातील डबीर मार्केटच्या उत्तर व दक्षिण बाजूस अनधिकृत पानाची व चहाची टपरी टाकून जाण्या – येण्याचा मार्ग बंद केल्याने संतापलेल्या रहिवाशांनी सोमवारी (दि. 19) सकाळपासून रोहा नगर परिषद मुख्याधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.
रोहा-नागोठणे मार्गावरील डबीर मार्केटच्या इमारतीत रहिवासी कांतीलाल वाघमारे व फरजाना सय्यद या दोघांच्या मालकीचे फ्लॅट असून, या इमारतीच्या दक्षिण व उत्तर बाजूस अनधिकृत चहा व पानाची टपरी टाकून येण्या-जाण्याचा मार्ग बंद करण्यात आला आहे, अशी तक्रार वाघमारे व सदय्य यांनी याआधी नगर परिषदेकडे केली होती. सदर अनधिकृत टपरी हटविण्याकरीता 13 ऑगस्ट रोजी वाघमारे व सदय्य यांनी जिल्हाधिकार्यांनाही लेखी निवेदन दिले आहे. या निवेदनाच्या अनुषंगाने नगर परिषदेने शुक्रवारी (दि. 16) कारवाई केली, मात्र ती थातुरमातुर पद्धतीची असून अद्याप मार्ग मोकळा झालेला नाही. जागा मोकळी होईपर्यंत येथील रहिवाशांनी मुख्याधिकारी कार्यालयासमोर सोमवारी सकाळपासून ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. दरम्यान, नगराध्यक्ष व अन्य पदाधिकार्यांशी चर्चा करून सदर टपर्या येत्या 30 दिवसांत जमीनदोस्त करण्याचे आश्वासन उपनगराध्यक्ष मयूर दिवेकर यांनी दिले आहे.
टपरी व बेकरीचे अनधिकृत बांधकाम पाडण्यात आले आहे. उर्वरित शेड काढण्यासाठी संबंधितांना नोटीस देण्यात आली आहे. त्यांनी शेड न काढल्यास नगर परिषदेच्या वतीने योग्य ती कारवाई करण्यात येईल. -बाळासाहेब चव्हाण, मुख्याधिकारी, रोहा अष्टमी नगर परिषद