Breaking News

थेरोंडा खंडोबा मंंदिरातील चांदीच्या मूर्तीवर चोरट्यांचा डल्ला

रेवदंडा ः प्रतिनिधी

थेरोंडा खंडेरावपाड्यातील भरवस्तीत असलेल्या खंडोबा मंदिरातील पाच किलो 360 ग्रॅम वजनाच्या चांदीच्या मूर्ती अज्ञात चोरट्याने बुधवारी (दि. 17) रात्रीचे वेळी लंपास केल्या. या प्रकरणी रेवदंडा पोलीस ठाणे येथे अज्ञातांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरातून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

गुरुवारी पहाटे पूजाअर्चा करण्यास गेलेल्या ग्रामस्थांच्या निदर्शनास हा प्रकार आल्यानंतर तत्काळ रेवदंडा पोलीस ठाण्यात तक्रार नोंद्रविण्यात आली. थेरोंडा खंडेरावपाडा मंदिरात असलेल्या लाकडी देव्हार्‍यात 50 वर्षापूर्वीच्या चांदीच्या मूर्ती, तांब्याचा मुलामा व चांदीचा लोलक असे एकूण पाच किलो 360 ग्रॅम वजनाच्या चांदीच्या मूर्ती होत्या. या सर्व मूर्तीची चोरी झाल्याची तक्रार गोरखनाथ लक्ष्मण नवरीकर यांनी रेवदंडा पोलिस ठाणे येथे दिली आहे.

घटनास्थळी रेवदंडा पोलीस निरिक्षक देवीदास मुपडे तत्काळ हजर झाले. घटनेचे गांभिर्य व कोळी समाजाच्या भावना लक्षात घेऊन अलिबाग गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक देवानंद गावडे यांनीही घटनास्थळी लागलीच धाव घेतली. तेथील ग्रामस्थांचा जबाब घेऊन पंचनाम्यास सुरुवात करण्यात आली, यावेळी स्थानिक ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. अधिक तपास रेवदंडा पोलिस ठाण्याचे पोलीस निरिक्षक देविदास मुपडे हे करीत आहेत.

पर्वतवासी श्री दत्त मंदिर चौल भोवाळे येथील मंदिरातील गाभार्यातील चांदीची प्रभावळ चोरीस गेल्याची घटनेचा तपास लागण्यापूर्वीच थेरोंडा येथे भरवस्तीत असलेल्या खंडोबा मंदिरातील चांदीच्या मूर्तीची चोरीची घटना घडल्याने परिसरात संप्तत प्रतिक्रिया उमटत आहेत.

Check Also

खासदार सुनील तटकरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

महायुतीकडून विजयाचा निर्धार अलिबाग : प्रतिनिधी रायगड लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खासदार सुनील तटकरे यांनी …

Leave a Reply