कर्जत : बातमीदार
नेरळ आणि कळंबमधील मुस्लिम जमात पाठोपाठ दामत-ममदापूर आणि गोरेगाव येथील मुस्लिम जमातीने पूरग्रस्तांसाठी गोळा केलेल्या मदतीचे थेट सांगलीमध्ये जाऊन वितरण केले. दरम्यान, दामत या
मुस्लिमबहुल गावात राजकीय वातावरणामुळे कोणीही कधी एकत्र येत नाही, पण पूरग्रस्तांच्या मदतीच्या निमित्ताने सर्व जमात एकत्र आल्याचे चित्र निर्माण झाले आहे. नेरळ-बदलापूर रस्त्यावर असलेल्या दामत या गावची आर्थिक परिस्थिती जेमतेम अशी आहे. गावातील राजकीय वातावरणामुळे ग्रामस्थ कधीही एकत्र येत नाहीत, मात्र कोल्हापूर, सातारा आणि सांगलीतील महापुराचे संकट आणि त्याची तीव्रता लक्षात घेऊन या दामत गावातील तरुणांनी एकत्र येत पूरग्रस्तांना मदत करण्याचे आवाहन केले. त्याला प्रतिसाद देत गावातील मशिदीच्या हॉलमध्ये किराणा सामानापासून कपडे, ब्लँकेट्स, चादर, सॅनेटरी पॅड्स, तांदूळ, आटा आणि बिस्किट्स इत्यादी साहित्य गोळा झाले. या कार्यात बाजूच्या ममदापूर आणि गोरेगाव येथील मुस्लिम जमातने हातभार लावून सुमारे चार लाखांचे साहित्य गोळा केले. ते सर्व साहित्य वेगवेगळ्या 400 पिशव्यांत भरले. दामात गावातील सरफराज नजे, अश्फाक नजे, साजिद नजे, नासिर नजे, नइम आढाल, टीवाले, खोत, तांबोळी तसेच साजिद शब्बीर नजे, सरफराज नजे, तौसिफ सरवले, एजाज टीवाले, अश्फाक नजे, मुझममिल शब्बीर नजे आणि त्यांच्या सहकार्यांनी पूरग्रस्त राजापूर आणि आळस (ता. शिरवळ, जि. कोल्हापूर) गावात जावून त्या पिशव्यांचे वाटप केले.