शांघाई : वृत्तसंस्था
भारतीय क्रिकेट नियामक बोर्डाने (बीसीसीआय) क्रिकेटपटू एस. श्रीसंतच्या आजीवन बंदीत कपात केली आहे. श्रीसंतवर आता केवळ सात वर्षांची बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बीसीसीआयच्या निर्णयानंतर श्रीसंतवरील बंदी पुढील वर्षी 13 सप्टेंबर 2020 रोजी संपणार आहे. बीसीसीआयच्या लोकपालने हा निर्णय दिला आहे.
आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणी दोषी आढळल्यानंतर श्रीसंतवर आयसीसीने आजीवन बंदी घातली होती, मात्र या आजीवन बंदीच्या शिक्षेबाबत बीसीसीआयने पुनर्विचार करावा आणि तीन महिन्यांच्या आत याबाबतचा निकाल द्यावा, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. त्यानंतर बीसीसीआयमध्ये लोकपाल म्हणून डी. के. जैन यांची नियुक्ती झाली आणि हे प्रकरण त्यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. याबाबत निर्णय देताना लोकपाल म्हणाले की, श्रीसंतने आपल्या उमेदीच्या काळातील बराचसा काळ मैदानाबाहेर घालवला असून, जवळपास सहा वर्षांच्या बंदीची शिक्षा भोगली आहे. त्यामुळे त्याच्यावरील आजीवन बंदी उठवून त्याला सात वर्षांच्या बंदीची शिक्षा देण्यात आली आहे. त्याच्या या बंदीचा कालावधी सप्टेंबर 2020मध्ये पूर्ण होईल. त्यानंतर तो क्रिकेटच्या मैदानावर परतू शकतो.
काय होते प्रकरण ? श्रीसंतला 2013मध्ये आयपीएल स्पॉट फिक्सिंगच्या आरोपावरून दिल्ली पोलिसांनी मुंबईतून अटक केली होती. त्यानंतर बीसीसीआयने श्रीसंतवर आजीवन बंदी घालण्याचा आणि 10 लाख रुपये दंड ठोठावण्याचा निर्णय घेतला होता.