Breaking News

निसर्ग, पर्यावरण आणि आपण

निसर्ग म्हणजेच प्रकृतीची सर्वांत मोठी व्यवस्था आहे. पर्यावरण म्हणजे आपल्या जवळ असलेला निसर्गाचा भाग आणि आपण म्हणजे मानव ह्या विराट व अनंत पसरलेल्या व्यवस्थेमधील एक छोटे कण मात्र आहोत. भगवान बुद्धांचं एक वचन आठवतं. धम्मपदामध्ये त्यांनी म्हटलं आहे की, मानव मध्य देशामध्ये आहे. त्याचा अर्थ मानव ह्या सर्व अस्तित्वाच्या मध्यामध्ये आहे. ह्याला आजच्या वैज्ञानिक भाषेत सांगायचं तर सर्वांत सूक्ष्म वस्तू- अणू किंवा अणूचाही मूळ कण आणि सर्वांत मोठं विश्व- अनंत पसरलेलं ह्या दोन टोकांच्या बरोबर मध्यभागी मानव आहे. मानव अणूपेक्षा तितकाच मोठा आहे जितकं विश्व मानवापेक्षा मोठं आहे. भगवान बुद्धांनी हेसुद्धा म्हंटलं आहे की, मानव एक चौरस्ता आहे. एक जंक्शन आहे. बुद्ध म्हणतात माणसाच्या चार शक्यता आहेत. एक शक्यता पशू होण्याची आहे- दु:खाकडे जाण्याची आहे. कारण मानवाचा भूतकाळ पशूचा आहे. दुसरी शक्यता सुखाची आहे ज्याला स्वर्ग म्हणतात. तिसरी शक्यता मानव म्हणूनच राहण्याची आहे. तणावग्रस्त- सुख आणि दु:ख अशा चकरा मारणारा. आणि चौथी शक्यता बुद्धत्व आहे जे सुख आणि दु:ख दोन्हीच्या पलीकडे आहे. माणूस हा निसर्गामधला असा घटक आहे जो नैसर्गिकसुद्धा असतो आणि अनैसर्गिकसुद्धा असू शकतो. जर मानवाने बुद्धत्व प्राप्त केलं तर तो अतिशय वर पोहचतो. आणि तोच माणूस जर पशूंच्या पातळीवर खाली उतरला तर पशूंपेक्षाही वाईट होतो. ह्याचा अर्थ हासुद्धा आहे की, मानव आणि प्रकृती ह्यांच्यामध्ये खूप मोठा पारस्परिक संबंध आहे आणि सूक्ष्म अर्थाने एक दवबिंदूसुद्धा हिमालयाशी जोडलेला आहे. किंबहुना हे सर्व नैसर्गिक घटक एकमेकांशी अतिशय जवळून जोडलेले आहेत आणि एक दुसर्‍यांना प्रभावितही करतात. विज्ञानही हीच गोष्ट सांगतो.

दुष्काळाचाच उदाहरण घेऊ. दुष्काळ एका प्रकारचा रोग आहे किंवा तणावाची स्थिती आहे, पण आपलं लक्ष आपण रोगापेक्षा आरोग्याकडे- मूळ स्वस्थ स्थितीकडे द्यायला पाहिजे. त्यामुळे अशी मूळ स्वस्थ स्थिती म्हणजे काय, हे समजून घ्यायला हवं. स्वस्थ स्थिती कशाला मानता येईल? हा तसा फार गुंतागुंतीचा प्रश्न. कारण अबसोल्युट पातळीवर बघितलं तर जे काही होतंय, जे काही भीषण, कितीही अमानवी, आर्टिफिशिएल किंवा अनैसर्गिक वाटणारं होतं, ते सर्व निसर्गातच होतं, पण इथे आपण स्वस्थ स्थिती संतुलनाची स्थिती आहे, असं मानूया. स्वस्थ स्थिती म्हणजे प्रकृतीमधील सर्व पैलूंमध्ये समन्वय. ज्याला सिंबायोसिस म्हणतात- साहचर्य. अशी स्थिती ज्यामध्ये सर्व घटक समान प्रकारे विकसित होऊ शकतात आणि सर्वांसाठी अनुकूलता असते.

मूलत: पृथ्वी अशाच स्थितीमध्ये होती, पण मानवाचा दर्जा विशिष्ट आहे. त्यामुळे ही स्वस्थ स्थिती संकटात सापडली आहे. त्यामुळे ह्या दृष्टिकोनातून बघितलं तर दुष्काळ एक रोगाची स्थिती आहेच, पण एका अर्थाने तो निसर्गाचा स्वत:ला संतुलित करण्याचा मार्गही आहे. विज्ञानामधला एक नियम इथे महत्त्वाचा आहे. न्यूटनचा नियम सांगतो की, विश्वात ऊर्जा निर्माणही करता येत नाही आणि नष्टही करता येत नाही. ती फक्त रुपांतरित करता येऊ शकते.

ऊर्जेची रूपे- फॉर्म्स फक्त बदलत राहतात. कधी ती पाणी असते, कधी बर्फ तर कधी बाष्प बनते. कधी ती हिरव्या झाडांच्या रूपात असते, तर कधी जीवाश्माच्या किंवा तोडलेल्या लाकडांच्या रूपात असते. ही सर्व ऊर्जेची माध्यमे मात्र आहेत.

त्यामुळे ह्या समस्यांकडे आपण माणूस ह्या नजरेतून न बघता प्रकृतीतील एक घटक म्हणून बघायला हवं. प्रकृतीमध्ये प्रत्येक व्यवस्थेचे नियम असतात. सर्व काही नियमांनुसारच होत असतं. ह्या नियम प्रणालीलाच भगवान बुद्धांच्या भाषेमध्ये किंवा विपश्यना परंपरेमध्ये निसर्गाचा नियम- प्रकृतीचा गुणधर्म (धर्म शब्दाचा मूळ अर्थ हाच) म्हटले जाते. हे नियम छोट्या कणापासून मोठ्या तार्‍यापर्यंत आणि दोन तार्‍यांमध्ये असलेल्या विराट पोकळीलाही लागू होतात. अशा नियमांना प्रकृती बांधिल असते. त्यामुळे असं बघावं लागेल की, निसर्गामध्ये पृथ्वी ग्रहावरच्या मानवासाठी असे नियम काय आहेत? ह्याला अशाही प्रकारे विचारात घेता येऊ शकेल. पृथ्वीवर मानवासाठीची स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर काय आहे? नैसर्गिक व्यवस्थेचं फ्रेमवर्क काय आहे? संतुलन टिकवून ठेवण्यासाठी त्या चौकटीत रहावं लागेल. जर मानव त्याच्या बुद्धीमुळे त्या चौकटीचे उल्लंघन करत असेल, तर त्यामुळे पूर्ण संतुलन बाधित होईल आणि हळूहळू त्याचे परिणाम होऊ लागतील. त्यामुळे आपल्याला पूर्वीच्या काळी मानव- प्रकृती संतुलनाच्या स्थितीचा विचार करावा लागेल. आज पृथ्वीवर वेगवेगळ्या जागी आणि देशांमध्ये मानव-प्रकृती संतुलन स्थिती कशी आहे, हे बघावं लागेल. गुरुत्वाकर्षण हा निसर्गाचा नियम आहे आणि म्हणून रस्त्यावर चालताना त्याचं पालन करावं लागतं. जर कोणी गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध गेलं तर तो खाली पडेल हा निसर्गाचा सरळ नियम आणि हाच इतर परिस्थितीमध्ये बघण्याचे अनेक निकष आहेत.

Check Also

खासदार बारणेंच्या विजयासाठी पनवेलमध्ये जोरदार प्रचार

आमदार प्रशांत ठाकूर, माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांचा सहभाग पनवेल : रामप्रहर वृत्त मावळ …

Leave a Reply