Breaking News

आजपासून वाशीत जागतिक स्तरावरील आरोग्यदायी कार्यक्रम

पनवेल : रामप्रहर वृत्त

आयुष मंत्रालय भारत सरकार, राज्य सरकार, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, भारतीय केंद्रीय चिकित्सा परिषद, एमसीआयएम, सिडको, नवी मुंबई महानगरपालिका, डॉ. डी. जी. पोळ फाऊंडेशन आणि डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने 22 ते 25 ऑगस्टपर्यंत आयोजित वर्ल्ड आयुष एक्स्पो आणि आरोग्य 2019 या जागतिक स्तरावरील आरोग्यदायी कार्यक्रमाला वाशी येथे सुरुवात होणार आहे.

वाशी येथील सिडको एक्झिबिशन व कन्व्हेंशन सेंटर येथे हा चार दिवसीय कार्यक्रम होणार असून, त्याचे उद्घाटन 22 ऑगस्टला सायंकाळी 6 वाजता केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांच्या हस्ते होणार आहे. या समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून परराष्ट्र राज्यमंत्री श्री. मुरलीधरन, खासदार सर्वश्री श्रीकांत शिंदे, राजन विचारे, श्रीरंग बारणे, आमदार संदीप नाईक, नवी मुंबईचे महापौर जयवंत सुतार, पनवेलच्या महापौर डॉ. कविता चौतमोल, नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त अण्णासाहेब मिसाळ, पनवेल महापालिकेचे आयुक्त गणेश देशमुख, महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठाचे कुलगुरू दिलीप म्हैसेकर, रजिस्ट्रार डॉ. के. डी. चव्हाण, डॉ. जी. डी. पोळ आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

या कार्यक्रमात आयुर्वेद, युनानी, होमिओपॅथी, योग, निसर्गोपचार, सिद्ध या भारतीय चिकित्सा पद्धतींविषयी 50पेक्षा अधिक कार्यशाळा व 10 परिसंवाद, तर सर्वसामान्य जनतेसाठी आरोग्यविषयक प्रदर्शन, मोफत महाआरोग्य शिबिर व चर्चासत्रे होणार आहेत. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने होणार्‍या चर्चासत्रात शेतकरी व औषधी वनस्पती व्यापारी यांच्या संयुक्त बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. प्रदर्शन, परिसंवाद, व कार्यशाळेस देश-विदेशातून 10 हजार डॉक्टरांची व वैद्यकीय विद्यार्थ्यांची उपस्थिती लाभणार आहे. या कार्यक्रमाचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन सिडको अध्यक्ष तथा आयोजन कमिटीचे प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर, आमदार मंदाताई म्हात्रे, आयोजन कमिटीचे सचिव डॉ. विष्णू बावणे यांनी केले आहे.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply