विकासासाठी वनमंत्र्यांकडून 11 कोटी 65 लाखांचा निधी मंजूर
मुंबई : रामप्रहर वृत्त
पर्यटकांचे आकर्षण असलेल्या कर्नाळा अभयारण्याचे रूपडे आता पालटणार असून, ते जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ होणार आहे. यासाठी 11 कोटी 65 लाख रुपयांचा निधी वने व अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बुधवारी (दि. 21) मंत्रालयात झालेल्या बैठकीत मंजूर केला. यामुळे भाजप जिल्हा सरचिटणीस व जेएनपीटी विश्वस्त महेश बालदी यांच्या प्रयत्नाला यश आले आहे.
मुंबई-गोवा महामार्गावरील कर्नाळा अभयारण्य विकसित करण्यासंदर्भात बुधवारी मंत्रालयात वनखात्याच्या वतीने बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस वने व अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, भाजप नेते महेश बालदी, जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, प्रधान मुख्य वनसरंक्षक विकास खरगे, अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक सुनील लिमये, उपवनसंरक्षक अर्जुन म्हसे, कर्नाळा अभयारण्य वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप चव्हाण, वास्तुविशारद इंद्रजित नागेशकर, भाजप पळस्पे विभागीय अध्यक्ष सुनील गवंडी, ग्राम परिस्थितीकीय विकास समितीचे शिरढोण अध्यक्ष व माजी उपसरपंच मंगेश वाकडीकर आदी उपस्थित होते.
पर्यटनाला आता मिळणार चालना
या वेळी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी कर्नाळा अभयारण्याच्या विकासासाठी 11 कोटी 65 लाख रुपयांचा निधी मंजूर केला. यामध्ये थिएटर, अॅडव्हेंचर पार्क, वॉटरफॉल व्ह्युविंग गॅलरी, वूड डेग गॅलरी, चेंजिग रूम, पाथ वे आदी आकर्षणे व वैशिष्ट्यपूर्ण सुविधा पर्यटकांसाठी उपलब्ध असणार आहेत. यामुळे या अभयारण्यात पर्यटनाला चालना मिळणार आहे.