पेण : प्रतिनिधी
दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पेणच्या बाजारात रंगविलेली मातीची आकर्षक मडकी विक्रीस आली आहेत. त्याची खरेदीसुद्धा सुरू झाली आहे. दहीहंडी उत्सवाला सर्वत्र अनन्यसाधारण महत्त्व आहे. उंचच उंच थर लावून दहीहंडी फोडणे हे गोविंदा पथकांचे मुख्य आकर्षण असते. या दहीहंड्या फोडण्यासाठी विविध गोविंदा पथके दोन महिन्यांपासून सराव करीत असून, दहीहंडी फोडण्यासाठी ते सज्ज झाले आहेत. या दहीहंडीमध्ये सजवण्यात येणार्या मडक्यांनासुद्धा महत्त्व असून विविध रंगांनी व वेगवेगळ्या पद्धतीने सजविलेली मडकी विक्रीसाठी पेण बाजारपेठेत, कुंभारवाड्यात आली आहेत. पेणच्या बाजारात छोट्या दहीहंडीसाठी लागणारी मडकी 25 ते 30 रुपयांस उपलब्ध आहेत. दहीहंडीसाठी आकर्षक रंगसंगतीने सजवलेली पेणची मडकी गेल्या काही वर्षांपासून मुंबईतील बाजारातही मोठ्या संख्येने जाऊ लागली आहेत. सध्या ही रंगविलेली मडकी घेण्यासाठी गोविंदा मंडळाचे कार्यकर्ते व नागरिकांची पावले पेणच्या कुंभारवाड्याकडे वळू लागली आहेत.