रोहा : दापोली कृषी महाविद्यालयाच्या कृषिदूतांनी कृषी कार्यानुभव अंतर्गत रोहे तालुक्यातील यशवंतखार गावातील 80 जनावरांना पायलागन रोगविरोधी लसीकरण केले. या वेळी पशुचिकित्सक डॉ. युवराज सुरकुले आणि परिचर दिवेकर यांनी मार्गदर्शन व सहकार्य केले. त्यांनी शेतकर्यांना लसीकरणाचे महत्त्व व फायदे पटवून दिले. या वेळी घेण्यात आलेल्या शिबिरात रोहा येथील कृषी विज्ञान केंद्राचे प्रा. डॉ. प्रमोद मांडवकर व दापोली कृषी विद्यापीठाचे प्रा. डॉ. भगत यांनी मार्गदर्शन केले. भूमिपुत्र गटप्रमुख राजरत्न पाटील, सदस्य जयंत शिंदे, चेतन जगताप, शुभम धाडवे, विशाल थोरात यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले.
श्रीगाव येथे वर्षावास कार्यक्रम
श्रीगाव : अलिबाग बौद्धजन पंचायत समितीतर्फे दर रविवारी प्रत्येक शाखेत वर्षावास कार्यक्रम घेण्यात येतो. त्यानुसार रविवारी (दि. 25) दुपारी 2 वाजता श्रीगाव येथील बुद्धविहारात वर्षावास कार्यक्रम होणार असून, त्यामध्ये बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे वाचन होणार आहे. अलिबाग तालुक्यातील बौद्धजन पंचायत समिती शाखेतील पदाधिकारी व बंधू-भगिनींनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन श्रीगाव बौद्धजन पंचायत समितीचे अध्यक्ष केशव ओव्हाळ यांनी केले आहे.
वढाव येथे श्रीकृष्ण जन्मोत्सव
पेण : तालुक्यातील वढाव येथील श्री राधाकृष्ण मंदिरात 17 ऑगस्टपासून श्रीकृष्ण जन्मोत्सव सप्ताह सोहळा मोठ्या उत्साहात व भक्तीभावाने सुरू झाला असून त्याची सांगता 26 ऑगस्ट रोजी करण्यात येणार आहे. या सप्ताहानिमित्त गंगाधर व्यास यांच्या कीर्तनाचे कार्यक्रम तसेच भजन, प्रवचन, आरती, पारायण असे विविध कार्यक्रम रोज होत असून त्याचा लाभ परिसरातील भाविक घेत आहेत. 24 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता श्रींचा पाळणा महोत्सव व दुपारी 12 वाजता श्रींचा छबीना महोत्सव तसेच 26 ऑगस्ट रोजी पादुका पूजन व ललिताचे कीर्तन असे कार्यक्रम होणार आहेत.