लोकनेते रामशेठ ठाकूर यांची 50 लाखांची देणगी
पनवेल : रामप्रहर वृत्त
मातृसंस्था मानून रयत शिक्षण संस्थेसाठी नेहमीच सढळ हस्ते मदत करणारे रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिल सदस्य तथा माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी 50 लाख, तर जनरल बॉडी सदस्य महेंद्र घरत यांनी 25 लाख रुपयांची आर्थिक मदत अहमदनगर जिल्ह्यातील श्रीमती कोंडाबाई नानासाहेब कडू पाटील कन्या विद्यालयास केली आहे. या मदतीचा धनादेश ‘रयत’चे उपाध्यक्ष अरुण कडू पाटील, सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक कैलास शिंदे यांच्याकडे गुरुवारी (दि. 29) सुपूर्द केला.
अहमदनगर जिल्ह्याच्या राहुरी तालुक्यातील सात्रळ येथील रयत संकुलात मुलींसाठी स्वतंत्र विद्यालय आहे. पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी स्वतः सात्रळ गावी येऊन स्व. कॉम्रेड पी. बी. कडू पाटील आणि ग्रामस्थांच्या मदतीने ‘रयत’ची शाखा सुरू केली. शाखेची नंतर मुले आणि मुली विभाग अशी विभागणी झाली. सध्या मुली विभागासाठी असलेली इमारत पूर्णपणे निकामी आणि धोकादायक स्थितीत आहे. त्यामुळे कन्या विद्यालयाच्या इमारतीचे बांधकाम पाडून नवीन इमारत बांधणे आवश्यक आहे. त्या संदर्भात रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर यांची रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष अरुण कडू पाटील, सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक कैलास शिंदे यांच्यासह मान्यवरांनी भेट घेत याची माहिती दिली.
या वेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी शाळेच्या नवीन इमारतीच्या बांधकामासाठी 50 लाख, तर जनरल बॉडी सदस्य महेंद्र घरत यांनी 25 लाख रुपयांची अर्थिक मदत केली आणि या मदतीचा धनादेश सुपूर्द केला. धनादेश देतेवेळी रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष अरुण कडू पाटील, सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक कैलास शिंदे, जनरल बॉडी सदस्य वाय. टी. देशमुख, कृष्णागर जेजुरकर, प्रगती संस्थेचे चेअरमन विजयराव कडू-पाटील, हनुमंत गावचे माजी सरपंच भास्करराव फणसे, युवा नेते किरण कडू पाटील, रयतसेवक संघटनेचे भाऊसाहेब कडलग, उपशिक्षक स्वप्नील देशमुख, वैभव वसावे, मंगेश कडलग उपस्थित होते. इमारत बांधकामासाठी मदत केल्याबद्दल लोकनेते रामशेठ ठाकूर आणि जनरल बॉडी सदस्य महेंद्र घरत यांचे उपस्थित मान्यवरांनी आभार मानले.