Breaking News

पाण्यासाठी आक्रोश

महाविकास आघाडी सरकार सत्तेत येण्यापूर्वी वीज आणि पाणी हे दोन्ही मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी तत्कालीन फडणवीस सरकार किती तडफेने काम करत होते हे सार्‍या महाराष्ट्राने पाहिले आहे. फडणवीस सरकारच्या कारकीर्दीत वीजेच्या लोडशेडिंगची नामुष्की कधी आली नाही. जेव्हा जेव्हा वीजेचा प्रश्न शेतकर्‍यांसमोर उग्रपणे आ वासून उभा राहिला, तेव्हा तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि वीजमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी तो ताबडतोब सोडवला. शेतकरी व गोरगरिबांना त्याची झळ लागू दिली नाही. पाण्याच्या प्रश्नी देखील असेच प्रामाणिक प्रयत्न केले गेले.

मराठवाडा हा महाराष्ट्रातील सर्वाधिक तहानलेला इलाखा. या भागाला दरवर्षी भेडसावणारा पाणीपुरवठ्याचा प्रश्न कायमस्वरुपी सोडवण्यासाठी याआधीच्या फडणवीस सरकारने सर्वंकष योजना आखली होती. परंतु मराठवाड्याला सुजलाम सुफलाम करणारी फडणवीस यांच्या मनातली महत्त्वाकांक्षी मराठावाडा वॉटरग्रिड योजना महाविकास आघाडीने सत्तेवर आल्या-आल्या गुंडाळली. औरंगाबादमध्ये सोमवारी निघालेला जलआक्रोश मोर्चा ज्यांनी कुणी टीव्हीवर पाहिला असेल, त्यांना पाण्याबाबत विद्यमान सरकार किती संवेदनाशून्य आहे हे निश्चितच समजले असेल. औरंगाबादेतील जलआक्रोश मोर्चा भारतीय जनता पक्षाच्या वतीने काढण्यात आला होता. त्यात हजारो औरंगाबादकर उत्स्फूर्तपणे सामील झाले होते. मोर्चातील महिलांचा सहभाग लक्षणीय होता. या मोर्चासाठी जय्यत तयारी करण्यात आली होती. पैठणगेट भागातून सुरू झालेला हा अतिविशाल मोर्चा औरंगाबाद महापालिकेच्या इमारतीकडे धीम्या गतीने सरकू लागला, तेव्हा मोर्चातील आंदोलक महिला व पुरुष चांगलेच आक्रमक झालेले दिसले. विशेषत: महिलावर्गाने रिकामे हंडे व कळशा नाचवून महाविकास आघाडी सरकारची उरलीसुरली अब्रू देखील घालवली. विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आणि खासदार भागवत कराड हे दिग्गज नेते मोर्चात सामील झाले होते. गेले काही दिवस औरंगाबाद शहरात पाणीपुरवठ्याचा बोजवारा उडाला असून पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ लोकांवर आली आहे. औरंगाबाद शहर हे खरे तर जायकवाडी धरणासह अनेक धरण योजनांच्या निकटचे शहर आहे. परंतु धरणात पाणीसाठा असूनही औरंगाबादकरांच्या तोंडचे पाणी मात्र पळाले आहे. शिवसेनेच्या हाती वर्षानुवर्षे महापालिका असूनही या पक्षाने औरंगाबादचा पाणीप्रश्न सोडवण्यासाठी काहीही केले नाही ही वस्तुस्थिती आहे. दरवर्षी उन्हाळ्यात पाणीप्रश्न गंभीर झाला की थातुरमातूर उपाययोजना करून वेळ मारून नेण्याची शिवसेनेच्या येथील स्थानिक पुढार्‍यांना सवयच लागली आहे. भाजपच्या जलआक्रोश मोर्चाच्या वेळी शिवसेनेबद्दलचा जनतेमधील संताप स्पष्टपणे दिसून आला. मोर्चाच्या निमित्ताने संपूर्ण औरंगाबाद शहरात भारतीय जनता पक्षाची पोस्टर्स झळकत होती. या मोर्चासाठी तब्बल तीन हजार हंडे-कळशा आणि हजारो झेंडे मागवण्यात आले होते. इतकेच नव्हे तर उंटांच्या पाठीवर रिकामे हंडे लादून त्यांनाही मोर्चात सहभागी करून घेण्यात आले होते. या मोर्चाची धग शिवसेना नेत्यांना चांगलीच जाणवली असणार. कारण भाजपच्या पोस्टर्सना प्रत्युत्तर देण्यासाठी शिवसेनेच्या नेत्यांनी देखील पोस्टरबाजी करण्याचा दुबळा प्रयत्न केला. हा केवळ एका पक्षाचा मोर्चा नसून औरंगाबादच्या जनतेचा आक्रोश आहे असे देवेंद्र फडणवीस म्हणाले ते यथायोग्यच होते हे मोर्चाला मिळालेल्या प्रतिसादावरून दिसले. महाराष्ट्रातील गावागावांतून प्रक्षुब्ध जनतेचे असे मोर्चे निघतील, तेव्हाच सत्ताधार्‍यांचे डोळे उघडतील. पण तेव्हा फार उशीर झालेला असेल हे त्यांनी लक्षात घेतलेले बरे.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply