मोहाली ः वृत्तसंस्था
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली मैदानावर त्याच्या आक्रमक स्वभावासाठी ओळखला जातो. मोहालीच्या मैदानावर खेळवण्यात आलेल्या दुसर्या टी-20 सामन्यात भारताने द. आफ्रिकेवर 7 गडी राखून मात केली. विराटने फलंदाजीदरम्यान नाबाद 72 धावा करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला, मात्र याच सामन्यात विराटचा रुद्रावतार क्रिकेटप्रेमींना पाहायला मिळाला.
पहिल्यांदा गोलंदाजी करताना भारताने द. आफ्रिकेला 149 धावांवर रोखले. विराटने सामन्यात कर्णधार क्विंटन डी-कॉकचा सुरेख झेल पकडत आपण मैदानात फिट असल्याचे दाखवून दिले, मात्र इतर भारतीय क्षेत्ररक्षकांनी या सामन्यात थोडीशी निराशा केली. 10व्या षटकात मैदानात क्षेत्ररक्षणादरम्यान श्रेयस अय्यर गोंधळामुळे चेंडू वेळेत पकडू शकला नाही. यानंतर श्रेयसने केलेला थ्रो चुकीच्या दिशेने होता. त्यातच गोलंदाजीला असलेला हार्दिक पांड्या थ्रो पकडण्यासाठी जागेवर नसल्यामुळे आफ्रिकन फलंदाजांनी एकच्या जागी दोन धावा घेतल्या. यामुळे नाराज विराटने श्रेयसचा थ्रो पकडत स्टम्प जोराने उडवत आपली नाराजी मैदानावर दाखवली. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.