Breaking News

विरोधकांची अवस्था बुद्धू मुलासारखी

मुख्यमंत्र्यांचे विरोधकांवर टीकास्त्र

जळगाव ः प्रतिनिधी

निवडणुकीत अपयश आले म्हणून ईव्हीएमला दोष देणार्‍या विरोधकांची अवस्था पेन खराब होते म्हणून परीक्षेत नापास झालो, असे म्हणणार्‍या बुध्दू मुलासारखी झाल्याचा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जळगाव येथील जाहीर सभेत विरोधकांना लगावला. महाजनादेश यात्रेच्या दुसर्‍या टप्प्याच्या दुसर्‍या दिवशी ते सभेत बोलत होते. या वेळी पालकमंत्री गिरीश महाजन, ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, भाजप प्रदेश सरचिटणीस आ. सुजितसिंह ठाकूर, खा. उन्मेष पाटील, भाजप जळगाव शहर जिल्हाध्यक्ष आ. राजूमामा भोळे, आ. हरिभाऊ जावळे, आ. चंदूभाई पटेल आणि आ. स्मिता वाघ उपस्थित होते. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तेत असताना एवढी मुजोरी होती की त्यांनी जनतेचा विचारच केला नाही. त्यांनी जनतेची कामे करण्याऐवजी सदैव स्वतःची संस्थाने चालविण्यावर भर दिला. त्यामुळे आता जनता त्यांना सतत निवडणुकीत नाकारत आहे. मतदारांच्या मनात घर केल्याशिवाय मते मिळत नाहीत. कारण मते मतदार देतो ईव्हीएम नाही हे विरोधकांनी ध्यानात घ्यायला हवे. त्यांची अवस्था अशी झाली आहे की अभ्यास केला नाही म्हणून नापास झालेला बुद्धू मुलगा सांगतो की, खरंतर आपण पास होणार होतो आणि मेरीटमध्येच येणार होतो, पण पेन खराब असल्याने नापास झालो. त्यामुळेच विरोधक अपयशाबद्दल ईव्हीएमला दोष देत आहेत. निवडणुकीत यश मिळाले तेव्हा ईव्हीएम चांगले होते आणि अपयश आल्यावर ते वाईट असा दुटप्पीपणा विरोधक करीत असल्याची उपरोधिक टीकाही त्यांनी केली.

विरोधी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ईव्हीएमला शिव्या देत असताना आम्ही मात्र जनतेत जाऊन गेल्या पाच वर्षांत काय काम केले हे सांगत आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात की, लोकशाहीमध्ये जनता हीच दैवत असते. त्या दैवताचे दर्शन घेण्यासाठी महाजनादेश यात्रा काढली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली बलशाली राष्ट्र घडत आहे, तर आपल्याला समृद्ध महाराष्ट्र घडवायचा आहे. त्यासाठी जनादेश हवा असल्याचे त्यांनी सांगितले.

जळगावच्या विकासासाठी नगरविकास खात्याच्या माध्यमातून एक हजार 10 कोटी रुपये दिले आहेत. शहरात पिण्याचे पाणी व भुयारी गटाराची योजना सुरू आहे. पंतप्रधान कार्यालयाच्या मदतीने हुडकोच्या कर्जाचा बोजा कमी केला असून जळगाव कर्जमुक्त करीत आहोत. खान्देशातील सिंचन प्रकल्पांना मोठ्या प्रमाणात निधी दिला असून कामे सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. या विधानसभा निवडणुकीत आमची कामगिरी दमदार असेल, तर विरोधकांची अवस्था इतकी गंभीर आहे की काँग्रेस-राष्ट्रवादीला कितीही प्रयत्न केले तरी 30चा आकडाही ओलांडता येणार नसल्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply