पोलादपूर : प्रतिनिधी
मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटामध्ये असलेल्या धामणदिवी (ता. पोलादपूर) गावालगत गुरूवारी (दि. 1)पहाटेच्या सुमारास एक कंटेनर कोसळून काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. मात्र, कशेडी टॅप वाहतूक पोलिसांनी तातडीने एकेरी वाहतूक सुरू केल्याने महामार्गावरील वर्दळ सुरळीत राहिली.
चालक मोहम्मद अहमद सिद्दिकी (वय 26, मुळ रा. इलाहाबाद, उत्तर प्रदेश, सध्या रा. न्हावाशेवा उरण) हा त्याच्या ताब्यातील कंटेनर (एमएच-46, बीएफ-2813) चालवीत मुंबई-गोवा महामार्गावरून चिपळूणकडे चालला होता. गुरुवारी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास पोलादपूर जवळील धामणदेवी गावालगत एक कार ओव्हरटेक करीत असताना चालकाने कंटेनर रोडच्या डाव्या बाजूला घेण्याचा प्रयत्न केला. त्यात कंटेनर महामार्गावर पलटी झाला. या अपघातामध्ये कंटेनरचे नुकसान झाले असून, चालकाच्या उजव्या पायाला मुका मार लागला आहे.
या अपघातामुळे महामार्गावर वाहतुककोंडी होण्याची शक्यता लक्षात घेऊन सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक यशवंत बोडकर यांनी वाहतूक पोलिसांच्या मदतीने तातडीने एकेरी वाहतूक चालू केली.