Breaking News

बोरघाटाला धोक्याचा भोंगा

भारतीय रेल्वेचा इतिहास दीडशे ते पावणे दोनशे वर्षांचा आहे. इंग्रजांनी भारतात आगीनगाडी आणली असा समज असला तरी रेल्वेचे खरे प्रवर्तक मुंबईचे शिल्पकार नाना शंकरशेठ आहेत. नाना लंडनमध्ये गेले असता तेथील वाफेच्या इंजिनावर चालणारी आगीनगाडी पाहून नाना शंकरशेठ यांना अशी गाडी आपल्या देशात असावी याची कल्पना सुचली. त्यासाठी लागणारे भांडवल उभारण्याची  चिंता असताना गोर्‍या साहेबाने मदत केली. ग्रेट इंडियन रेल्वे नावाची कंपनी स्थापन करीत याच कंपनीला ब्रिटिश शासनाने पुढे बीबीसीआय, जीआयबी व मद्रास कोची लाइन अशा तीन कंपन्या उभारल्या. याच कंपन्या भारतीय रेल्वेत रूपांतरित करण्यात आल्या.

रेल्वेची बांधणी करण्यासाठी लोहमार्गास लागणारे सामान इंग्लंडहून तब्बल पाच हजार 703 बोटींतून भारतात समुद्रामार्गे येत असताना एक हजार 868 बोटींना जलसमाधी मिळाली. त्यामध्ये मोठे नुकसान होत बोटींसह रेल्वेचे सामानही समुद्रात बुडाले. अनेक अडचणी तसेच 1855 ते 1865 भारतातील संस्थानाचे बंड व 1857चा ब्रिटिश सत्तेविरोधात स्वातंत्र्याचा लढा अशा अनेक प्रसंगांवर मात करीत ब्रिटिश सरकारने वर्षाला सरासरी एक हजार मैल लांबीचा रेल्वे बांधणीचा वेग ठेवत संपूर्ण भारतात रेल्वेचे जाळे पसरवण्याचा इरादा स्पष्ट केला होता आणि तडीसही नेला. सध्याचे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल तत्कालीन बोरीबंदर व्हीटी स्टेशन ते ठाणे अशा 34 किमी साधारणपणे 21 मैल अंतराचे 16 एप्रिल 1853मध्ये दुपारी 3.30 मिनिटांनी मुंबई ते ठाणे प्रवास सुरू केला. त्यानंतर 1870 मध्ये मुंबई कोलकाता सहा हजार 400 किमी अंतराचे रेल्वे जाळे टाकण्यात आले. सध्या भारतात 63 हजार 140 किमी लांबीचे रेल्वेमार्ग असून 25 लाखांच्या आसपास कर्मचारी देशातील 16 विभागांतून तसेच कोकण रेल्वे विभागात कार्यरत आहेत.

ठाणे येथील पारसिक बोगदा हा भारतीय रेल्वेच्या इतिहासातील पहिला बोगदा ठरला आहे. देशात लोहमार्गावर एक लाख 47 हजार 523 पुलांची संख्या असून 100 वर्षांहून अधिक काळ जुने असणार्‍या पुलांची संख्या 37 हजार 689 आहे आणि अद्यापही भक्कम स्थितीत आहेत. भारतात रेल्वे सुरू झाल्यानंतरच्या पुढील दशकात 1870च्या आसपास मुंबई-पुणे अशी दोन महत्त्वाची शहरे जोडण्यासाठी बोरघाट बांधण्यात आला. यासाठी 20 हजार मजूर तीन वर्षे सतत खपत होते. माती व दगड टोपली

टोपलीने वाहतूक करण्यात आली होती. एक महाकाय टेकडी तयार होईल एवढा माती दगडांचा ढिगारा होता. खंडाळा लोणावळा तत्कालीन लोणावळा व  कर्जत पळसदरी अशा दोन्ही बाजूने बांधकाम सुरू ठेवले होते. 10 हजारांच्या आसपास कामगार तसेच तंत्रज्ञ या मार्गाच्या निर्मितीत बळी पडले होते. युध्दपातळीवर काम अशी संज्ञा बोरघाटच्या निर्मितीवरून पडली असावी अशी स्थिती होती. बांधकामाला सुरुवात झाल्यापासून ब्रिटिशांनी निधीचा तुटवडा जाणवू दिला नव्हता. एवढी चोख व्यवस्था तरतूद  केली होती. बोरघाटाच्या निर्मितीसाठी ब्रिटिशांनी एक कोटी पाच लाख 267 रुपये म्हणजेच एक मैलाला सहा लाख 64 हजार 375 रुपये खर्च केले असल्याची नोंद आहे. त्याकाळी एक रुपयात 50 किलो तांदूळ किंवा सोप्या भाषेत सांगायचे तर 10 ते 15 रुपये महिना अधिकारी किंवा कर्मचार्‍यांचा पगार होता. त्याकाळी एवढा प्रचंड खर्च ब्रिटिशांनी बोरघाटाच्या निर्मितीसाठी केला होता. महाकाय बोगदे, प्रचंड दरी, चढउतार, रेव्हिसिंग स्टेशनसारखी चढण, बोगद्यातून जाताना येणारा आवाज, तर पर्वतरांगेत लोखंडी सडक, सह्याद्री पर्वताला एखादा दागिना शोभावा असा हा बोरघाट त्याकाळी दैवी देणगी किंवा निसर्गाचा चमत्कार वाटावा असा होता.

कर्जत येथे रेल्वेसाठी लागणारा माल उतरविला जात असल्याने कर्जत रेल्वे स्टेशन तयार झाल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.   हा इतिहास उगाळण्याची वेळ येऊन ठेपली ती मुंबई-पुणे लोहमार्गावरील कर्जत ते खंडाळा लोणावळा या 29 किमी अंतराच्या खंडाळा घाट म्हणजेच बोरघाटातील वाहतूक इतिहासातील 20 दिवस बंद ठेवण्याची नामुष्की मध्य रेल्वे प्रशासनावर आली असल्याच्या प्रसंगाने. 1987 साली बोरघाटातील नाथबाबा मंदिर येथे हैदराबाद मुंबई एक्स्प्रेसला झालेल्या अपघातात हा मार्ग फक्त एकच दिवस बंद ठेवण्यात आला होता.

ऐन दिवाळीच्या सणात झालेल्या  या अपघातात सहा प्रवासी ठार तर 30 प्रवासी जखमी झाले होते. हा या मार्गावरील व किरकोळ काही अपघात वगळता दीडशे वर्षांच्या काळात अद्याप हा लोहमार्ग बंद पडल्याचे कधी ऐकण्यात आले नाही, मात्र मागील दोन-तीन वर्षे या मार्गावर सतत दरड कोसळण्याच्या घटना घडत असल्याने हा लोहमार्ग सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. 26 जुलै ते 16 ऑगस्ट 2019 असा तब्बल 20 दिवस हा मार्ग बंद ठेवण्यात आला होता. लोहमार्गावरील नऊ ठिकाणी पुराच्या पाण्याने नुकसान केले होते. तर काही ठिकाणी जमीन भूस्खलन व काही बोगद्यांमध्ये दरड पडल्याने या लोहमार्गाच्या कामासाठी तब्बल 500च्या आसपास कामगार अहोरात्र झटत होते. रेल्वेच्या इतिहासात या लोहमार्गावर दरड किंवा नुकसान होण्याची सन 2018नंतरची ही दुसरी वेळ आहे. चालू वर्षात सहा वेळा मार्गावर दरड कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. 14 जून 2018पर्यंत दरड कोसळण्याच्या पाच घटना घडल्या आहेत. 21 ऑगस्ट 2018 रोजी मंकी हिल ते ठाकूरवाडीदरम्यान हुबळी लोकमान्य टिळक टर्मी. कुर्ला एक्स्प्रेसवर दोन

भलेमोठे दगड पडले होते. एक दगड डब्याचे छत फाडून प्रवाशांवर कोसळल्याने तीन प्रवासी गंभीर जखमी झाले होते, तर एक दगड डब्याच्या छतावर अडकला होता. 18 जुलै 2018 रोजी मुंबई-हैदराबाद मेलचे इंजीन घसरल्याने बोरघाटातील वाहतूक बाधित झाली होती. 7 जुलै 2019 रोजी पहाटे  4.30 वा. सुमारास जांबरुंग ठाकूरवाडीजवळ मालगाडी घसरल्याने बोरघाटातील वाहतुकीवर परिणाम झाला होता. 11 एप्रिल 2019 रोजी पळसदरी स्थानकाजवळ मालगाडीचा किरकोळ अपघात झाल्याने सकाळी सकाळीच वाहतूक दोन तास खोळंबली होती.

चाकरमान्यांना नोकरीवर दांडी मारावी लागली होती. 29 जुलै 2019 रोजी खंडाळा घाटातील जांबरुंग आणि पळसदरी स्थानकादरम्यान असणार्‍या  किमी.106 जवळ दुपारी 4.35 मिनिटांनी लोहमार्गावर महाकाय  दगड कोसळल्याने वाहतुकीवर परिणाम झाला होता. पुणे बाजूकडे जाणार्‍या परतीच्या प्रवाशांना याचा फटका बसला होता. सन 2018 मध्ये व सन 2019 मध्ये दरड कोसळणे व रेल्वे रुळावरून इंजीन किंवा गाड्या घसरणे अशा तब्बल 21 घटना घडल्या आहेत. सुदैवाने एक अपघात वगळता कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी रेल्वेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. प्रवासी वाहतूक व माल वाहतूक अशा अंदाजे 100 ते 125 कोटींचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मेल एक्स्प्रेस

प्रतिगाडी नऊ लाख व मालवाहतूक मालगाडी प्रति 50 लाखांचे उत्पन्न रेल्वेला मिळते. ते ठप्प झाल्याने नुकसानीचा सामना करावा लागला आहे.

रेल्वेचे मे 2019च्या अगोदरच्या कालावधीत दरड कोसळण्याची शक्यता असणार्‍या किमान 15 ठिकाणी लोखंडी जाळी किंवा लोखंडी बार उभे करण्यात आले आहेत, तर काही ठिकाणी सुरक्षिततेच्या उपाययोजनाही करण्यात आल्या आहेत. तरीही मागील दोन ते तीन वर्षांत बोरघाटात दरड कोसळण्याच्या  घटना वाढू लागल्या आहेत. ब्रिटिशांनी 100 वर्षे टिकतील असे दरीत पूल व डोंगरात बोगदे कोरले. ते अद्याप तसेच शाबूत असताना दरड कोसळण्याच्या घटनांनी प्रशासनाची हवा तंग केली आहे. दरड कोसळण्याच्या घटना जांबरुंग, नागनाथ मंदिर अशा 10 किमीच्या परिसरातच घडत असताना नेमके कारण काय यावर उलटसुलट चर्चा रंगू लागली आहे. या परिसरात सहा किमीच्या अंतरावर खालापुरातील खरवई, नवघर व माणकीवली या परिसरात किमान 10 दगडखाणी आहेत. या दगडखाणीत मोठमोठे स्फोट घडवून आणले जातात. शासकीय अधिकारी व स्थानिक पुढार्‍यांना हाताशी धरून दगडखाण मालक डोंगर फोडण्यासाठी स्फोट घडवतात. याचा परिणाम बोरघाटातील लोहमार्गावर होत असल्याचे म्हणणे स्थानिकांचे आहे. रेल्वे प्रशासनाने दरड कोसळण्याची कारणे शोधताना दगडखाणीतील स्फोटांकडेही बारकाईने लक्ष देण्याची आवश्यकता आहे, अन्यथा बोरघाटातील एखाद्या बोगद्यात किंवा दरीवर असणारा उंच पूल कोसळून गाडीच दरीत वा बोगद्यात गुप्त होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता दगडखाणी पाहिजेत की दीडशे वर्षांचा बोरघाटातील लोहमार्ग हे ठरवण्याची वेळ येऊन ठेपली आहे.

-अरूण नलावडे, फिरस्ती

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply