Breaking News

रोह्यात गुरे चोरणारी टोळी जेरबंद

रोहे : प्रतिनिधी

 रोहा-साळाव रस्त्यावरील गोफण गावातील गुरे पळविणार्‍या टोळीतील काही सदस्यांना 26 ऑगस्ट रोजी मध्यरात्रीच्या सुमारास रोहा पोलिसांनी गोफण ग्रामस्थांच्या मदतीने सापळा रचून पकडले. अधिक चौकशीत या टोळीचे मुंब्रा कनेक्शन उघडकीस आले असून या टोळीच्या अटकेने रोहा तालुक्यासह जिल्ह्यातील गुरे चोरीची अनेक प्रकरणे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

गोफण येथील गुरांच्या वाड्यात बांधून ठेवलेली जनावरे तसेच रस्त्यावर बसलेल्या जनावरांना गुंगीचे इंजेक्शन देऊन जनावरांना पळवून नेले जात होते. गोफण येथील शशिकांत कडू, नितेश कडू, पांडुरंग कडू, दिनेश कडू, विनोद भोईर, मारुती वाघमारे यांनी 26 ऑगस्टच्या मध्यरात्री पोलीस निरीक्षक जाधव यांच्या मदतीने पाठलाग करून तारेघर गावाजवळ गुरे चोरून नेणार्‍या टोळीचा एक बोलेरो पिकअप टेम्पो (एमएच-43, बीजी-3583) अडविला व मोहम्मद सलीम मो शमीर अन्सारी (रा. मदिना टॉवर, कौसा मुंब्रा) याला ताब्यात घेतले. मात्र रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत या टोळीचा सूत्रधार व अन्य सदस्य जंगल भागात पळून गेले असून ते सर्व मुंब्रा व कल्याण येथील रहिवासी आहेत. बोलेरो पिकअप टेम्पो जप्त करण्यात आला आहे.

या प्रकरणी गुरे चोरणार्‍या टोळीमधील आरोपींच्या विरोधात भादंवि कलम 379, 429, 511, 34 तसेच प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम 1960चे कलम 11, महाराष्ट्र प्राणी संरक्षण (सुधारणा) अधिनियम,1995 कलम 5अ आणि 9, मोटारवाहन अधिनियम 1988मधील कलम 66, 192, 83, 177अन्वये रोहा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे.

दरम्यान, गेल्या काही महिन्यात चणेरा विभागातील भागीरथीखार येथील संजय म्हात्रे यांचे तीन रेडे, सीताराम म्हात्रे यांचा एक रेडा व दोन म्हशी, जीवन म्हात्रे यांचे दोन रेडे, गोफण येथील अभिजीत शिंगरे यांची गाय, महादेवखार येथील नारायण गायकर यांचा रेडा चोरीस गेला आहे. गुरे पळवून नेणार्‍या टोळीला पकडण्यात आल्याचे वृत्त समजताच त्या सर्वांनी रोहा पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली आहे.

Check Also

उरण विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांचा होणार विकास

आमदार महेश बालदी यांच्या मागणी व पाठपुराव्याने 40 कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता उरण ः …

Leave a Reply