कर्जत : बातमीदार
आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेच्या महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचे महत्त्व पटावे असा प्रयत्न शासनाने सुरू केला आहे. कर्जत नगरपालिकेनेही पनवेल येथील लाईफलाईन हॉस्पिटल यांच्या सहकार्याने शहरात महिलांसाठी आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केले होते. या शिबिरात खुद्द नगराध्यक्ष सुवर्णा जोशी यांनी आपली आरोग्य तपासणी करून घेतली. कर्जत नगरपालिका कार्यालयात आयोजित केलेल्या या शिबिराचे उद्घाटन नगराध्यक्ष सुवर्णा जोशी यांचे हस्ते करण्यात आले. या वेळी उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल यांच्यासह बांधकाम समिती सभापती राहुल डाळिंबकर, संचिता पाटील, नगरसेवक बळवंत घुमरे, वैशाली मोरे, विशाखा जिनगरे, स्वामींनी मांजरे यांच्यासह कर्जत शहारातील बचत गटाचे प्रतिनिधी उपस्थित होते. या आरोग्य शिबिरात महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेमधील लाभार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. लाईफ लाईन हॉस्पिटलमधील डॉ. सुहास शेवाळे यांनी आरोग्यसेविका श्रुती कोळी, अविनाश पवार, प्रज्ञा कोळी यांच्या सहकार्याने महिलांची आरोग्य तपासणी केली.