Breaking News

पळस्पे फाट्यावर स्कूल व्हॅन जळून खाक

चालकाच्या प्रसंगावधनामुळे दोन विद्यार्थिनी बचावल्या

पनवेल ः वार्ताह

पनवेलजवळील पळस्पे फाटा येथे मंगळवारी (दि. 27) सकाळी एका स्कूल व्हॅनला आग लागून ती जळून खाक झाली. या वेळी वाहनचालकाने प्रसंगावधान राखून दोन विद्यार्थिनींना बाहेर काढल्याने चालकासह त्या बचावल्या.

स्कूल व्हॅनचालक आकाश अनिल तालिकोटी (24) याने नेहमीप्रमाणे मंगळवारी सकाळी 6 वाजता डेरवली येथून श्रावणी सावरकर या विद्यार्थिनीला आणि पळस्पे येथून वैष्णवी राय हिला पिकअप करून तो आपली व्हॅन (एमएच 46-जे 171) घेऊन नवीन पनवेल येथील डीएव्ही पब्लिक स्कूलच्या दिशेने चालला होता. ही व्हॅन 6.20च्या सुमारास पळस्पे फाटा परिसरात मल्हार रेसिडेन्सी हॉटेलसमोर आली असता चालकाला अचानक वास आला.

काहीतरी विपरीत घडत असल्याचे समजताच त्याने व्हॅन थांबवली आणि क्षणाचाही विलंब न लावता दोन्ही मुलींना बाहेर काढले. त्यांना सुरक्षित ठिकाणी उभे केल्यानंतर तो व्हॅनकडे धावत गेला. त्या वेळी मोठ्या प्रमाणात धूर गाडीतून बाहेर निघत होता.

आकाशने गाडीत असलेले अग्निशमन नळकांडे बाहेर काढत आग विझवण्याचा प्रयत्न केला. पाठीमागून आलेल्या स्कूल व्हॅनमधूनही नळकांडे घेऊन गाडीवर फवारले, मात्र आग काही विझली नाही. दरम्यानच्या काळात पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले, मात्र तोपर्यंत स्कूल व्हॅन आगीत जळून खाक झाली होती.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply