बासेल (स्वित्झर्लंड) : वृत्तसंस्था
भारताची बॅडमिंटन स्टार पी. व्ही. सिंधूच्या जागतिक विजेतेपदानंतर आता मानसी जोशीने पॅरा बॅडमिंटनमध्ये सुवर्णाक्षरात आपले नाव नोंदवले आहे. बासेल येथील वर्ल्ड पॅरा बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये एसएल-3च्या अंतिम सामन्यात हमवतन पारुल परमारचा पराभव करीत मानसीने जेतेपदावर नाव कोरले. अंतिम सामन्यात मानसीने 21-12, 21-7च्या फरकाने पारुलवर विजय मिळवला.
2011मध्ये एका अपघातामध्ये मानसीला आपला पाय गमवावा लागला होता. तब्बल 50 दिवस रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू होते. या दुर्घटनेनंतर आठ वर्षांनी मानसीने मैदानावर पुनरागमन करीत जेतेपदाला गवसणी घातली. मानसी पुलेला गोपीचंद यांच्या अकादमीत प्रशिक्षण घेत आहे. मानसीने तीन वेळच्या विश्व चॅम्पियन परमारला 21-12, 21-7च्या मोठ्या फरकाने पराभूत केले.
या स्पर्धेत भारताने आतापर्यंत 14 पदके जिंकली आहेत. यामध्ये तीन सुवर्णपदकांचा समावेश आहे. या यशाबद्दल भारतीय पॅरालम्पिक समितीने मानसीचे अभिनंदन केले.