
ब्रिटीशांचे राज्य असताना महात्मा जोतीराव फुले उपाख्यतात्या यांनी रायगडावर 1886 साली तब्बल तीन दिवस मुक्काम ठोकून शिवछत्रपतींची समाधी पाऊणशे वर्षांच्या माजलेल्या गवत-घाणेरीतून शोधून काढली. हिंदवी स्वराज्याचे अठरापगड जातींचे आणि सर्वधर्मियांचे म्हणजेच रयतेचे राज्य ज्या रायगडाने पाहिले; केवळ त्याचा एकमेव साक्षीदार खुद्द रायगड किल्लाच असल्याचे सांगता येऊ शकेल. शिवजयंतीदेखील महात्मा जोतीराव फुले यांनीच सुरू केली आणि ’कुळवाडीभूषण पवाडा गातो भोसल्यांचा।छत्रपती शिवाजींचा॥’ हा पोवाडाही महात्मा फुले यांनी रचला.
महात्मा ज्योतिबा फुले यांच्यानंतर 1886 सालीच जेम्स डग्लस या इंग्रज गृहस्थाने रायगडावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधी परिसरातील दुरवस्थेबाबत वर्णन लिहून ठेवले. यानंतर 1887 साली हे वर्णन वाचून रावबहादुर जोशी, लोकमान्य टिळक, न्यायमूर्ती तेलंग, न्यायमूर्ती रानडे, न्यायमूर्ती कुंटे सारे तत्कालीन सुविद्य नेते व समाजोध्दारक एकत्र झाले आणि यांनी रायगडाचा जीर्णोध्दार करण्याचे ठरविले. यासाठी ब्रिटिश सरकारने पाच रुपये प्रति वर्षी तजवीज करून दिली. त्यानंतर लोकमान्य टिळकांनी पुणे येथील हिराबागमध्ये शिवस्मारकाच्या जिर्णोध्दारासाठी फंड उभा करण्याचे आवाहन एका सभेत केले. त्यासाठी मंडळाची स्थापना झाली. या मंडळाला श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ असे म्हटले गेले. या समितीने तब्बल तीस वर्षानंतर 1926 साली शिवछत्रपतींच्या समाधीचा जीर्णोध्दार केला. त्याचवेळी वाघा कुत्र्याची समाधी बांधण्यात आली. यानंतर लोकमान्य टिळकांचे पर्व शिवजयंती उत्सवासंदर्भात सुरू झाले. शिर्के 5व्या शतकात रायगडाचे स्वामी होते. तेव्हाची गडस्वामिनी श्रीशिरकाईचे मंदिर लोकमान्य टिळकांच्या काळात मावळंकर नावाच्या इंजिनिअरने बांधले आहे. पण मूळ शिरकाई मंदिर राजवाडयास लागून डावीकडे होळी माळावरील होते. या मूळ देवळाच्या भग्न चबुतर्याजवळ ब्रिटीश काळापासून श्री शिरकाईचा घरटा हा नामफलक होता. यात खरे-खोटे केवळ साक्षीदार किल्ले रायगडच जाणतो.
1974 साली 300 वा शिवराज्याभिषेक दिन मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी या 1980 शिवपुण्यतिथी कार्यक्रमानिमित्त अभिवादन करण्यासाठी उपस्थित होत्या. त्यांनी महाराष्ट्र शासनाला निर्देश देऊन निर्माण केलेली मेघडंबरी सिंहासनाच्या चौथर्यावर 1985 साली स्थापन करण्यात येऊन त्याचे उद्धाटन तत्कालीन राष्ट्रपती ग्यानी झैलसिंग यांच्याहस्ते करण्यात आले. 1986 झाली तत्कालीन मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांनी शिवपुण्यतिथी कार्यक्रमानिमित्त अभिवादन करण्यासाठी उपस्थिती दर्शविली असता त्यांनी किल्ल्याच्या दूरवस्थेचे वर्णन पाहून श्रीशिवाजी रायगड स्मारक मंडळाकडे याबाबत अहवाल मागवला आणि रायगड किल्ले विकास आराखडा 1987 साली महाराष्ट्र सरकारला पहिल्यांदा सादर झाला. यानंतर बीओटी तत्त्वावर पुणे येथील जोग इंजिनिअर्स कडून 1996 साली रोप वे उभारण्यात आला आणि शिवराजधानी किल्ले रायगडावर शिवभक्तांची गर्दी दरवर्षीपेक्षा पन्नास पटीने वाढली. 1999 साली तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी रायगडच्या दुरवस्थेची माहिती घेत तातडीने एक कोटी रुपयांचा निधी केंद्रीय पुरातत्व विभागाकडे जमा केला आणि गडावर मोठया प्रमाणात किल्ला संवर्धनाची कामे सुरू झाली. 2009 साली छत्रपती युवराज संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समिती पुणे राजसभेतील सिंहासनाच्या चौथर्यावरील मेघडंबरीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा स्थापन केला.
2012 साली श्रीशिवाजी स्मारक मंडळाने केंद्रीय पुरातत्व खाते आणि महाराष्ट्र शासनाला सुधारित रायगड विकास आराखडा 2012 सादर केला. 2015 साली श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाच्या पुण्यतिथी अभिवादन कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहिले. त्यानंतर गडावर आणि पायथ्याशी पाचाड येथे तात्पुरती शिवसृष्टी उभारून रायगड महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. 6 जून 2016 रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी किल्ले रायगडच्या विकास आराखडयासाठी 606 कोटी जाहीर केला आणि छत्रपती युवराज संभाजीराजे यांच्या अध्यक्षतेखाली रायगड किल्ला जतन संवर्धन आणि आराखडा प्राधिकरण स्थापन करण्यात आले. या योजनेतील पहिल्या टप्प्यातील पन्नास कोटी रुपयांच्या कामास प्रारंभ झाला आहे. रायगड किल्ला हे जगभरातील एक अनन्यसाधारण ऐतिहासिक पर्यटन स्थळ व रायगड जिल्हा हा देशातील पहिल्या क्रमांकाचे पर्यटन स्थळ असेल, असे प्रतिपादन रायगड जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री व गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी 9 सप्टेंबर 2015 रोजी एका साप्ताहिकाच्या रायगड जिल्हा पर्यटन विशेषांक प्रकाशन सोहळयाप्रसंगी केले. त्यामुळे शिवराजधानी रायगडच्या दूरवस्थेसह दूर्लक्षाची सांगता नजिकच्या काळात राज्यातील भाजपा-शिवसेना सरकारच्या काळात होऊन शिवराजधानी किल्ले रायगडला गतवैभव प्राप्त होण्याचे संकेत मिळू लागले आहेत.
केंद्रीय पुरातत्व खात्याच्या नियमानुसार ऐतिहासिक वास्तूंचे फोटो व चित्रे उपलब्ध असल्यास त्याप्रमाणे पुनर्बांधणी करता येत असून अठरा झाली जेव्हा रायगड किल्ला बिटिश कर्नल प्राथर यांनी जिंकला; तेव्हा तेथील वास्तूचे रेखाचित्र व आराखडे काढले होते. कर्नल प्राथर तयार केलेला प्राप्त झाला असून त्यावेळच्या आराखडया उपलब्ध झाले नसल्याने रायगड किल्ल्याचे जतन व संवर्धन करण्याच्या कामाला गती मिळूनही पुनर्बांधणी करण्यासाठी खूप मर्यादा निर्माण झाल्या आहेत. मात्र रायगडावरील उत्खनना दरम्यान अनेक शिवकालीन वस्तूंचा खजिना दिसून आला त्यामध्ये देवांच्या मूर्ती, स्वयंपाकाची भांडी, दागिने, अवजारे, शस्त्र, बंदुकीच्या गोळया अशा अनेक वस्तूंसह दळणाची जाती देखील आढळून आल्याने शिवकालीन सभ्यता व संस्कृतीचाही अंदाज येत आहे.
रायगड किल्ला जतन संवर्धन आणि आराखडा प्राधिकरणाच्या कामांमध्ये प्रामुख्याने शिवसमाधी, वाघ्या कुत्रा समाधी, वाघदरवाजा, पालखी दरवाजा, राणीवसा, अष्टप्रधान वाडे, मनोरे, श्रीशिरकाई मंदिर, जगदीश्वर मंदिर, बाजारपेठ, हत्तीखाना, महादरवाजा, गडावरील निवासस्थानांचे अवशेष, चोरदिंडी, भवानी टोक, कुशावर्त तलाव, नाणे दरवाजा, राजसभा, राजभवन, नगारखाना, चित्तदरवाजा, खूबलढा बुरुज, हिरकणीचा बुरुज, वाघबीळ, मस्जिद मोर्चा, भवानी टोक, टकमक टोक, गंगासागर तलाव, कोळींब तलाव, कुशावर्त तलाव आणि पाचाड येथील जिजामाता समाधी, जिजामाता वाडा या त्याचा समावेश जतनासाठी करण्यात आलेला आहे. आपत्ती व्यवस्थापन व्यवस्थापन विकलांग व्यक्तींसाठी व्यवस्थापन शिलालेखांचे संवर्धन आणि संरक्षण प्रवासी थांबे साऊंड ऍंड लाईट शो, बागबगीचा आणि सुशोभीकरण रेलिंगची दुरुस्ती, महत्वाच्या दरवाजांची दुरूस्ती, मार्गदर्शक फलक आणि नकाशे लावणे, गडावरील महत्त्वाच्या मूताअना वज्रलेप करून पुन्हा झळाळी आणण्याचा प्रयत्न करणे, पिण्याचे पाणी, सीसीटीव्ही कॅमेरा, विजेच्या अंडरग्राउंड तारा तसेच गडावरील 84 तलाव स्वच्छ करण्याचे काम हाती घेण्यात येणार असून आतापर्यंत 21 तलावांतील साथीला गाळ माती यांच्या उपसा करून जलसंचय करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. शिवराजधानी रायगड किल्ल्यावरील रायगड जिल्हा परिषदेने बांधलेले विश्रामगृह, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने बांधलेले विश्रामगृह यांची दूरवस्था आता जिर्णाध्दाराने कात टाकतील अशी शक्यता निर्माण झाली आहे. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी महाड ते रायगड हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग घोषित केला आहे या रस्त्याचे रुंदीकरण सुरू झाले आहे. पायथ्याशी पाचाड येथे महाराष्ट्र शासनाने 88 एकर जमीन अधिग्रहित केली असून येथे शिवराजधानी किल्ले रायगड येथे नव्या पर्यटकांना शिवसृष्टी आणि माहिती केंद्र उभारून पूर्ण माहिती देण्यात येणार आहे.
शिवराजधानीचा इतिहास
रायगडाचे प्राचीन नाव ’रायरी’ हे होते. युरोपचे लोक त्यास ’पूर्वेकडील जिब्राल्टर’ असे म्हणत असत. जिब्राल्टरचे ठाणे जितके अजिंक्य तितकाच रायगड अजिंक्य व दुर्गम. पाचशे वर्षांपूर्वी त्यास गडाचे स्वरूप नव्हते व तो नुसता एक डोंगर होता, तेव्हा त्यास ’रासिवटा’ आणि ’तणस’ अशी दोन नावे होती. त्याचा आकार, उंची व सभोवतालच्या दर्या यावरून त्यास ’नंदादीप’ असेही नाव पडले. निजामशाहीत रायगडाचा उपयोग कैदी ठेवण्यापुरता होई. छ.शिवाजी महाराजांनी 6 एप्रिल 1656 रोजी रायरीस वेढा घातला व मे महिन्यात रायरी महाराजांच्या ताब्यात आली. तेथे असताना, कल्याणचा सुभेदार मुल्ला अहमद खजिना घेऊन विजापूरकडे निघाला असता महाराजांनी तो खजिना लुटून रायगडावर आणला व त्या खजिन्याचा उपयोग गडाच्या बांधकामासाठी केला. रायगडाचा माथा राजधानी बनवण्यास सोयीचा व पुरेसा आहे. शत्रूला अवघड वाटणार्या प्रदेशातले ते अधिक अवघड ठिकाण आहे. सागरी दळणवळणासही हे ठिकाण जवळ आहे. म्हणून महाराजांनी राजधानीसाठी या गडाची निवड केली. रायगडाची समुद्र सपाटीपासून किल्ल्याची उंची 2900फूट आहे. गडाला सुमारे 1450पायर्या आहेत.
सभासद बखर म्हणते, राजा खासा जाऊन पाहता गड बहुत चखोटा. चौतर्फा गडाचे कडे तासिल्याप्रमाणे दीड गांव उंच. पर्जन्यकाळी कडियावर गवत उगवत नाही आणि धोंडा तासीव एकच आहे. दौलताबाद पृथ्वीवर चखोट गड खरा, परंतु तो उंचीने थोडका. दौलताबादचे दशगुणी गड उंच असे देखोन बहुत संतुष्ट झाले आणि बोलिले, तक्तास जागा हाच गड करावा. याच दुर्गदुर्गेश्वर रायगडाला 15 विविध नावांनी संबोधिले गेले आहे. रायगड, रायरी, इस्लामगड,नंदादीप, जंबुद्वीप, तणस, राशिवटा, बदेनूर, रायगिरी, राजगिरी, भिवगड, रेड्डी, शिवलंका, राहीर आणि पूर्वेकडील जिब्राल्टर ही ती पंधरा नांवे आहेत.
औरंगाझेबाने इतिकादखानाला पाठवून सूर्याजी पिसाळांना वाईच्या देशमुखीचे आमीष दाखवून रायगड फितूरीने ताब्यात घेतला आणि इस्लामगड नांव ठेवले तर त्यानंतर 1733 मध्ये छ.शाहू महाराजांनी पुन्हा हा ताब्यात घेऊन नांव रायगड केले. त्यानंतर ब्रिटीशांनी मेजर हॉल, कॅ.प्रॉर्थर, ले.क्रॉसवी यांच्या नेतृत्वाखाली शिवराजधानी रायगडाचे स्वातंत्र्य पेशवाईकडून हिरावून घेतले. यानंतर या अभेद्य रायगडाची वासलात ब्रिटीशांच्या दूर्लक्षामुळे लागण्यास सुरूवात झाली. अशातच लॉर्ड कर्झनने ऐतिहासिक वस्तू संरक्षणाचा कायदा केल्याने या शिवराजधानी रायगडाची लोकवस्ती विरळ होऊ लागली. फिरस्ते इंग्रजच फक्त येथे येत असत. यानंतर शिवराजधानी किल्ले रायगड तब्बल 78 वर्षे अज्ञातवासात राहिला. मात्र, लॉर्ड कर्झनचा कायदा आता पुरातत्व विभागाच्या रूपाने अद्याप शिवराजधानी रायगडाला स्वत: करायचे नाही आणि कोणाला काही करून द्यायचे नाही, या मानसिकतेतून कायम त्रासदायक ठरू पाहात असताना गेल्या दशकापासून याठिकाणी सकारात्मक विचारसरणीचे बदल घडू लागलेले पाहण्यास मिळत आहेत.
गेल्या दशकामध्ये पाचाड येथील राजमाता जिजाऊ माँसाहेबांचा पंचधातूंचा पुतळा चोरीला जाणे, शिवसमाधीजवळील वाघ्या कुत्र्याची समाधी तोडली जाणे आणि अलिकडेच मेघडंबरीतील छ.शिवरायांच्या पुतळयाची पंचधातूची तलवार तोडल्याच्या अप्रिय घटनांवेळी झालेले जनक्षोभ वगळता शिवराजधानी किल्ले रायगड कायमच तमाम शिवभक्तांचे प्रेरणास्थान म्हणूनच अजरामर राहणार आहे. या शिवराजाधानी रायगड किल्ल्याच्या वैभवशाली इतिहासाला नवराष्ट्राची झळाळी प्राप्त होण्यासाठी केंद्र आणि राज्यसरकारचे प्रयत्न लवकरच यशस्वी होवोत.
-शैलेश पालकर, खबरबात
RamPrahar – The Panvel Daily Paper