पनवेल : रामप्रहर वृत्त
उलवे नोड येथील रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचा जलतरणपटू प्रभात कोळी याला मानाचा तेनसिंग नोर्गे राष्ट्रीय साहसी पुरस्कार जाहीर झाला आहे. 29 सप्टेंबर रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. पाच लाख रुपये, स्मृतिचिन्ह आणि प्रशस्तिपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
नेरूळ येथे राहणार्या 19 वर्षीय प्रभात कोळी याने नुकताच दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊनचा आठ किमीचा समुद्र पार केला. हाच त्याचा जगातील मान्यताप्राप्त आठवा समुद्र पार करण्याचा विक्रमही ठरला. न्यूझीलंडची कूक स्ट्रीट, इंग्लिश खाडी, कॅटलिना, कैवी, सुगारु, नॉर्थ चॅनल आणि जिब्राल्टरची सामुद्रधुनी असे एकूण सात खडतर टप्पे प्रभातने यापूर्वी पूर्ण केले आहेत. त्यातील काही टप्प्यांत सर्वांत तरुण खेळाडू म्हणून त्याच्या नावाची नोंद झाली आहे.
तेनसिंग नोर्गे राष्ट्रीय साहसी पुरस्कारासाठी प्रभातच्या नावाची घोषणा झाल्याने त्याचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.