उरण ः रामप्रहर वृत्त
सूरत येथे कोचिंग क्लासला आग लागल्याची दुर्दैवी घटना घडून त्यात 22 मुलांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे कोचिंग क्लासेसच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. अशाप्रकारचे उरणमध्ये अनेक कोचिंग क्लासेस आहेत. त्यांचे फायर ऑडिट होत नाही. आग लागली तर बाहेर पडायला जागा नाही. पालकांकडून भरमसाठ फी आकारूनसुद्धा उरणमध्ये कोचिंग क्लासला शिकणार्या विद्यार्थ्यांची सुरक्षा रामभरोसे आहे. त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. येथे कोणत्याही सोयी-सुविधा नसून सूरतसारखी घटना उरणमध्ये घडल्यास मुलांच्या सुरक्षितेच्या दृष्टीने भीतीचे वातावरण पसरले आहे. उरण परिसरात खाजगी क्लासेसची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. शाळेचे शुल्क त्याचबरोबर खाजगी क्लासेसचे पॅकेज भरता भरता पालक मेटाकुटीला आले आहेत. उरण परिसरात अनेक शैक्षणिक संस्थेत हजारो विद्यार्थी शिक्षण घेतात. त्यांच्या पालकांवर शाळेच्या फीचा भार तर आहेच, त्याचबरोबर खाजगी क्लासेसही विद्यार्थ्यांना लावावे लागतात. विनाअनुदानित शाळेत शिकवणारे शिक्षक खाजगी क्लासेस घेतात. त्यातून त्यांना चांगले पैसे मिळतात. सध्या गल्लोगल्ली कोचिंग क्लासेस असून त्यात दरवर्षी भर पडत आहे. या क्लासेसचे फायर ऑडिट होत नसल्याने पालकांमध्ये भीती, तसेच भरमसाठ फी आकारून सुविधांचा अभाव उरणमध्ये असल्याचे चित्र दिसत आहे. तरी याची चौकशी करून योग्य ती खबरदारी घेऊन अशा दोषी असणार्या क्लासवर कडक कारवाई करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.