Breaking News

उत्सव पर्यावरणस्नेही व्हावा

गरीब असोत वा श्रीमंत सर्व स्तरांतील वस्त्यांमध्ये सार्वजनिक गणेशोत्सव तितक्याच उत्साहात साजरा केला जाताना दिसतो. हा उत्सव जसा लोकांना एकत्र आणतो, सार्वजनिक जीवनाची रंगत वाढवतो, तसाच तो काही प्रमाणात प्रदूषणातही भर घालतो हे आपण मान्य करायलाच हवे. तसे ते केले तरच आपण हे प्रदूषण रोखण्यास वा कमी करण्यास हातभार लावू शकू.

गणेशोत्सव हा महाराष्ट्रीय संस्कृतीचा अविभाज्य घटक व ओळख आहे. अनेकदा महाराष्ट्राची ओळख म्हणून गणेशोत्सवातील विशाल मूर्तींची, मिरवणुकांची प्रतिमा वापरलेली आढळून येते. महाराष्ट्रभरात दहा दिवस रंगणार्‍या या उत्सवाची जादू अशी की इथे राहणार्‍या प्रत्येकाला हा उत्सव हवाहवासा वाटतो. गेल्या दोन दशकभरात तर मुंबई व आसपासच्या परिसरातील कित्येक अमराठी घरांमधूनही गणेशमूर्तीची स्थापना होऊ लागली आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळेही मराठीबहुल भागांपुरती सीमित राहिलेली नाहीत. यंदा प्लास्टिक पिशवी आणि थर्माकोलमुक्त गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ तसेच राज्याच्या पर्यावरण विभागाकडून केले जाताना पहायला मिळते आहे. हे असे आवाहन करण्याची वेळ आली आहे कारण उत्सवाच्या या दहा दिवसांत अनेक प्रकारे पर्यावरणाची हानी होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. परंतु पर्यावरणाचा हा र्‍हास रोखण्याच्या दिशेने व्यापक प्रयत्न झालेले नाहीत. गणेशोत्सवात पूजेसाठी आणली जाणारी मूर्ती आज साधारणपणे प्लास्टर ऑफ पॅरिसचीच असते. पूर्वी बहुतेक मूर्ती शाडूच्या मातीच्या असत. परंतु मूर्तीचा एखादाही भाग भंगल्यास गणेशाचा कोप होऊ शकतो असा समज जनमानसात दृढ असल्याने जसजशा प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती उपलब्ध होऊ लागल्या, त्यांची लोकप्रियता वाढत गेली. मोठ्या आकाराच्या मूर्तींसाठी तर प्लास्टर ऑफ पॅरिसला पर्यायच नव्हता. काळाच्या ओघात घरगुती आणि सार्वजनिक अशा दोन्ही स्वरुपाच्या गणपतींची संख्या वाढत जाऊन आता एकट्या मुंबई शहरात जवळपास दीड लाखाच्या आसपास मूर्ती विसर्जित केल्या जातात. यातील बहुतांश मूर्ती या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या असतात आणि त्यांचे नैसर्गिक विघटन होत नाही. खेरीज त्यांच्यासाठी वापरले गेलेले रासायनिक रंग, सजावटीमधील प्लास्टिक आदी पर्यावरणाला घातक असे घटक या सार्‍यांच्या एकत्रित परिणामातून दरवर्षी या उत्सवातून होणारी पर्यावरणाची हानी वाढतच चालली आहे हे आपण समजून घेण्याची गरज आहे. त्यामुळेच सरकारी पातळीवरून हे प्रदूषण रोखण्याची मोहीम आता राबवावी लागत आहे. गणेशोत्सव हा आपला सर्वांचाच लाडका उत्सव आहे. त्याचे स्वागत उत्साहातच व्हायला हवे. परंतु ते करताना आपण हा उत्सव शक्य तितक्या पर्यावरणस्नेही पद्धतीनेच साजरा करायला हवा आहे. मूर्तीचा आकार लहान ठेवावा, शक्य तो शाडूच्या मातीची मूर्ती आणावी, सजावटीचे सामान पूर्णत: नैसर्गिक व सहज विघटन होऊ शकेल अशा घटकांपासून बनवलेले असावे, सामानखरेदीत तसेच प्रसाद वाटण्यासाठी देखील प्लास्टिकचा वापर करू नये, मंडळांच्या गर्दीमुळे वाहतूक अडून प्रदूषण होणार नाही याची देखील दक्षता घेतली पाहिजे व सरतेशेवटी विसर्जनाचे वेळी मूर्तीचे मांगल्य राखतानाच पर्यावरणाची हानी टाळण्याचीही तितकीच दक्षता घेतली पाहिजे. पर्यावरणाच्या संवर्धनासाठी ही सारी काळजी घेतल्यास बाप्पा निश्चितच आपल्यावरील विघ्नांचे हरण करण्यास धावून येईल.

Check Also

गरजेपोटी बांधलेली घरे, पिण्याचे पाणी, नैना, पायाभूत सुविधासंदर्भात योग्य नियोजन व्हावे

आमदार प्रशांत ठाकूर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त गरजेपोटी बांधलेली घरे, पिण्याचे पाणी, …

Leave a Reply