Breaking News

बांगलादेशी नागरिक अटकेत

पनवेल : वार्ताहर

मोठा खांदा परिसरात बेकायदेशीररीत्या वास्तव्यास असलेल्या आणखी 11 घुसखोर बांगलादेशी नागरिकांना मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाच्या विशेष शाखेने अटक केली. यात चार महिला, सहा पुरुष, तसेच एका लहान मुलीचा समावेश आहे. हे सगळे बांगलादेशी नागरिक गेल्या वर्षभरापासून या भागात मोलमजुरी, घरकाम करून राहत असल्याचे तपासात आढळून आले आहे. गेल्या आठवड्यातदेखील मुंबई पोलिसांच्या विशेष शाखेने जुई-कामोठे भागात राहाणार्‍या तीन घुसखोर बांगलादेशी नागरिकांना अटक केली होती.

मोठा खांदा भागात आणखी काही घुसखोर बांगलादेशी नागरिक बेकायदेशीररीत्या वास्त्यव्यास असल्याची माहिती मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाच्या विशेष शाखेला मिळाली होती. त्यानुसार या शाखेने कामोठे पोलिसांच्या मदतीने मोठा खांदा परिसरात विविध ठिकाणी छापे मारले. या वेळी सेक्टर 14 मधील चाळीत मनिरुल नझरुल मंडल (32), शकीला मनिरुल मंडल (30), सेक्टर-15 मधील साई रेसीडेन्सीमध्ये सलिम फुका शेख (42), रेश्मा रौफ सरदार (24), सेलेना बाबूल शेख (35), तसेच सेलेनाची तीन वर्षीय मुलगी सोमी बाबूल शेख हे सहा जण राहात असल्याचे आढळून आले. त्याचप्रमाणे मोठा खांदा गावातील अन्य चाळींमध्ये बाबूल लुकमान शेख (45), बबलू मझसिल सिकंदर (38), नवाज समिर शेख (20), मनुरा इरफान गाझी (50), शहानारा तरीकुल शेख (30) हे पाच जण राहत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे पोलीस पथकाने या सर्वांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे प्राथमिक चौकशी केली, तसेच त्यांना भारतीय नागरिक असल्याबाबत पुरावे सादर करण्यास सांगितले, मात्र ते कोणतेही ठोस पुरावे सादर करू शकले नाहीत. त्यामुळे ते बांगलादेशी घुसखोर नागरिक असल्याचे स्पष्ट झाले.

अधिक चौकशीत सगळ्यांनी बांगलादेशी नागरिक असल्याचे स्वतः कबूल केले, तसेच त्यांनी बांगलादेशातील गरिबीला कंटाळून रोजगार मिळवण्यासाठी घुसखोरीच्या मार्गाने भारतात प्रवेश केल्याचे सांगितले.

या 11 बांगलादेशी नागरिकांनी वैध प्रवासी कागदपत्राशिवाय, तसेच भारत-बांग्लादेश सीमेवरील मुलखी अधिकार्‍यांच्या परवानगीशिवाय घुसखोरीच्या मार्गाने भारतात प्रवेश करून मोठा खांदा, कामोठे परिसरात गेल्या वर्षभरापासून अवैधरीत्या वास्तव्य करीत असल्याचे आढळून आल्याने या सगळ्यांविरोधात आय शाखेने कामोठे पोलीस ठाण्यात पारपत्र अधिनियमानुसार, तसेच परकीय नागरी कायद्यानुसार गुन्हा दाखल करून सगळ्यांना अटक केली आहे.

या कारवाईच्या काही दिवसांपूर्वी मुंबई पोलिसांच्या विशेष शाखेने कामोठे येथील जुई गावात बेकायदेशीररीत्या वास्तव्यास असलेल्या तीन बांगलादेशी नागरिकांना अटक केली होती. या कारवाईत बांगलादेशी महिलेसोबत विवाह करून तिला आश्रय देणार्‍या व्यक्तीलादेखील पोलिसांनी अटक होती. त्यापाठोपाठ पोलिसांनी कामोठे, मोठा खांदा परिसरातून आणखी 11 घुसखोर बांगलादेशी नागरिकांना अटक केली आहे. कामोठे, मोठा खांदा परिसरात बेकायदेशीररीत्या राहणार्‍या बांगलादेशी नागरिकांच्या वास्तव्यावरून त्या भागात राहणार्‍या नागरिकांमधून चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

Check Also

आगामी निवडणुकीतही आमदार प्रशांत ठाकूर यांना विजयी करा -दयानंद सोपटे

तळोजा ः रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघातून तीन वेळा आपण आमदार प्रशांत ठाकूर यांच्यावर विश्वास …

Leave a Reply