खारघर : रामप्रहर वृत्त
पनवेल महानगरपालिका अंतर्गत जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धा नुकतीच नावडे येथील परशुराम जोमा म्हात्रे हायस्कूलच्या प्रांगणात झाली. या स्पर्धेत जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन आपली ताकद दाखवून दिली.
कुस्तीच्या ग्रीको रोमन प्रकारात कल्पेश चौधरी (इयत्ता बारावी), अबुझार मुल्ला (दहावी), सिद्धेश खडकर (नववी) व वैष्णव धोत्रे (नववी) यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. फ्री स्टाईल कुस्तीमध्ये कश्यप पटेल (बारावी) याने प्रथम क्रमांक प्राप्त केला, तर प्रिन्स शमी (दहावी), प्रशांत आग्रहारी (दहावी) आणि कृष्ण कुसाळकर (आठवी) यांनी द्वितीय क्रमांक प्राप्त केला. संस्थेचे चेअरमन, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर व शाळेच्या मुख्याध्यापिका राज अलोनी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांसह त्यांना मार्गदर्शन करणारे मंदार मुंबईकर यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.