सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांचे आश्वासन
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त
वाशीतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती ही आशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठ आहे. या ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा देण्याचा मानस असल्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी (दि.29) सांगितले. येथील भाजीपाला संकुलाच्या छत्रपती संभाजी महाराज भाजीपाला आवारातील अतिरिक्त 285 गाळ्यांच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या वेळी ना. पाटील यांनी कृषी बाजार समितीत आजही अनेक बदल करण्याची गरज असल्याचे सांगत शेतीपूरक व्यवसायांनादेखील बाजार समिती आवारात जागा उपलब्ध करून दिली पाहिजे, असे सांगितले. परदेशात शेतमालाची ज्या पद्धतीची मागणी आहे, तशी आंतरराष्ट्रीय सुविधा उपलब्ध करून शेतीपूरक घटकांचा आंतरराष्ट्रीय पातळीवर व्यवसाय झाला पाहिजे. यासाठी ‘एपीएमसी’चे प्रशासक सतीश सोनी यांनी तसा प्रस्ताव आणण्याच्या सूचना या वेळी त्यांनी केल्या. मी जरी पणनमंत्री नसलो तरी यासाठी वेळ पडल्यास कायद्यात काही तरतूद करून या बाजार समितीला आंतरराष्ट्रीय बाजार समिती बनविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन या वेळी त्यांनी दिले. या वेळी आमदार मंदा म्हात्रे, अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद पाटील, वडार समिती अध्यक्ष विजय चौगुले, एपीएमसी प्रशासक सतीश सोनी, माजी स्थायी सभापती शुभांगी पाटील, नवी मुंबई भाजप जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत आदी मान्यवर उपस्थित होते.