Breaking News

मुंबईचा ‘हार्दिक’ विजय

बंगळुरूच्या पदरी आणखी एक पराभव

मुंबई : प्रतिनिधी

वानखेडे मैदानावर मुंबईने बंगळुरूला पाच गडी राखून पराभूत केले. मोक्याच्या क्षणी हार्दिक पांड्याने केलेल्या फटकेबाजीच्या बळावर मुंबईने बंगळुरूला पाणी पाजले. त्यामुळे सहा सामन्यांनंतर एक विजय मिळवलेल्या बंगळुरूच्या पदरी पुन्हा एकदा निराशा आली. बंगळुरूने दिलेले 172 धावांचे आव्हान मुंबईने एक षटक राखून पूर्ण केले.

172 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईचा ‘हिटमॅन’ रोहित शर्मा आणि क्विंटन डी कॉक यांनी संघाला दणकेबाज सुरुवात करून दिली. या दोघांनी तुफान फटकेबाजी करत 25 चेंडूंत मुंबईला अर्धशतक गाठून दिले. 70 धावांच्या भागीदारीनंतर रोहित बाद झाला. त्याने प्रत्येकी दोन चौकार आणि षटकार लगावत 28 धावा केल्या. रोहितपाठोपाठ डी कॉकदेखील एकाच षटकात माघारी परतला. मोईन अलीने मुंबईचे सलामीवीर माघारी धाडले. डी कॉकने पाच चौकार आणि दोन षटकार खेचत 40 धावा केल्या. धोकादायक सुरुवात करणारा ईशान किशन यष्टिचीत झाला. फिरकीपटूंवर हल्लाबोल करीत त्याने 3 षटकारांसह 9 चेंडूंत 21 धावा केल्या, पण चौथा षटकार खेचताना तो बाद झाला. संयमी खेळी करणारा सूर्यकुमार यादव फटकेबाजीच्या प्रयत्नात बाद झाला. त्याने 23 चेंडूत 29 धावा केल्या. कृणाल पांड्यादेखील 11 धावांवर बाद झाला. त्यानंतर हार्दिक पांड्या धमाकेदार खेळी केली आणि संघाला विजय मिळवून दिला. हार्दिक पांड्याने 16 चेंडूंत नाबाद 37 धावा केल्या.

कर्णधार रोहित शर्माने सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. बंगळुरूचा कर्णधार विराट कोहली हा स्विंग होणार्‍या चेंडूवर झेलबाद झाला. जेसन बेहरनडॉर्फ याने त्याला एका चौकारासह 9 धावांवर माघारी धाडले. डावखुरा सलामीवीर पार्थिव पटेल चांगली फटकेबाजी करीत होता, पण हार्दिक पांड्याने त्याला माघारी धाडले. पार्थिवने 20 चेंडूंत चार चौकार आणि एक षटकार खेचत 28 धावा केल्या. एबी डीव्हिलियर्स आणि मोईन अली या जोडीने बंगळुरूच्या डाव सावरला. त्यामुळे बंगळुरूला 14व्या षटकात शतकी मजल मारता आली. डीव्हिलयर्स आणि अली या दोघांनी फटकेबाजी करून आपली अर्धशतके पूर्ण केली. अर्धशतकानंतर लगेचच मोईन अली माघारी गेला. अलीने 35 चेंडूंत 50 धावा केल्या. क्षेत्ररक्षणासाठी प्रसिद्ध असलेल्या पोलार्डने सीमारेषेवरून अप्रतिम थ्रो केला. तो चेंडू थेट स्टंपवर लागला आणि डीव्हिलियर्स धावचीत झाला. त्याने 51 चेंडूंत 75 धावांची झंझावाती खेळी केली. शेवटच्या षटकात बंगळुरूचा डाव गडगडला. मलिंगाने चतुराईने केलेल्या गोलंदाजीमुळे त्या षटकात केवळ आठ धावा खर्च झाल्या, तर 3 बळी मिळाले.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply