


9 ऑगस्ट 1982 साली मूळ निवासींचे पहिले संमेलन संयुक्त राष्ट्र संघात भरले होते. 1994पासून विश्व आदिवासी दिन ीींळलरश्र वरू साजरा करण्यात येत आहे. मूळ रहिवासी असणार्यांना आदिवासी असे म्हटले जाते. स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी पर्यायांच्या व जंगलांच्या आश्रयाला जाऊन राहिल्याने त्यांना गिरिजन असेही संबोधले जाते. अरण्यात राहणारे म्हणून भारतीय संविधानात अनुसूचित जमाती असा उल्लेख आढळतो. अबोरीजीनल हा इंग्लिश शब्द आदिवासींसाठी पाश्चिमात्य देशात वापरला जातो.
अमेरिका, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, युरोपियन भूप्रदेशात वसाहती स्थापल्या होत्या. तिथे आधीपासून राहणार्या रहिवाशांना आदिवासी नाव देण्यात आले. सर्वात आधी अधिवास असणारा समाज. हा समाज जमिनीचा मालक नाही. अल्पभूधारक आहे. अनेक समस्यांनी अद्यापही ग्रासला आहे. समाजाच्या उन्नतीसाठी एकोणिसाव्या व विसाव्या शतकात आदिवासी समाजात अनेक महापुरुष होऊन गेले. या समाजसुधारकांनी समाजाच्या उन्नतीकडेच लक्ष दिले, असे नाही तर समाजाची प्रगती, उत्थान साधत असताना पहिले प्राधान्य दिले ते देशहिताला व देशाचे स्वातंत्र्य लढ्यासाठी महाराष्ट्रासह मेघालय, मणिपूर, नागालँड, झारखंड, राजस्थान, बिहार, छत्तीसगड अशा राज्यांतून अनेक आदिवासी समाजाचे संत, समाजसेवक, लढवय्ये निर्माण झाले. समाजाच्या हितापेक्षा पहिले प्राधान्य देशप्रेमाला दिले.
इंग्रज सत्तेविरुद्ध उठाव करीत असल्याने अनेक आदिवासी क्रांतिकारकांच्या घरांची राखरांगोळी झाली, मात्र त्या घटना इतिहासजमा झाल्या असल्या तरी असे समाजसेवक, देशाभिमानी क्रांतिकारक, आदिवासी समाजाबरोबरच देशबांधवांच्या मनामध्ये घर करून देवता रूपात मनावर बिंबले आहेत. बिरसा मुंडा यांचा इंग्रजी सत्तेविरुद्ध लढताना गोर्या अधिकार्यांनी अतोनात छळ केला. बिरसा मुंडा देशासाठी व समाजासाठी शहीद झाल्याने आदिवासी समाज शहीद दिन म्हणून साजरा करतात. त्या दिवशी सर्व आदिवासी एकत्र येत अनेक समाजोपयोगी विधायक कामे करीत असतात. बिरसा मुंडा आदिवासी समाजात एका गरीब कुटुंबात जन्मलेला मात्र तेजस्वी, निडर, मुत्सद्दी, शूरवीर असा बिरसा मुंडा शेळीपालन करीत असे. देशप्रेमाचे व समाजाच्या हिताचे वेड लागले. बासरीवादन हा त्याचा मुख्य छंद. बासरीत तल्लीन होऊन देहभान विसरत असे. बिरसा मुंडा शिक्षणाचे धडे गिरवत असताना एका ख्रिस्ती धर्मप्रसारकाशी त्याचा संबंध आल्याने व गरिबीची झळ असल्याने बिरसाच्या पित्याने ख्रिश्चन धर्म स्वीकारला. बिरसा बाप्तिस्मा करण्यात आला. बिरसाला नवे नाव मिळाले मात्र इंग्रज आणि मिशनरी हे आदिवासी समाजाचे विरोधक असल्याची जाणीव झाल्याने इंग्रज सत्तेविरुद्ध कडक निंदा करू लागला. आदिवासी समाजाला मयत किंवा घरात जन्म झाला तरी कर भरावा लागत असे, तसेच घरात धार्मिक कार्यक्रम केले तरी कर द्यावा लागत असे. अन्याय करणारे जमीनदार, इंग्रज, ठेकेदार आदिवासींचे शोषण करीत असतानाच इंग्रज ठेकेदार कुठे गेला तरी आदिवासींना त्यांची सेवा, चाकरी, कामे करण्यासाठी इंग्रजांबरोबर जावे लागत असे. कोळवासीयांना त्याच्याबद्दल फुटकी कवडीही देत नसत. एकोणिसाव्या शतकाच्या प्रारंभी ईस्ट इंडिया कंपनीने छोटा नागपूर बळकावले. 1809मध्ये ईस्ट इंडिया कंपनीने आदिवासींवर त्यांच्या उपयोगी असणारे उपजीविकेचे साधन असणार्या शेती व्यवस्थेचे बारा वाजवून शेती आणि रानासाठी नवीन नियम-कायदे तयार करण्यात आले. वसुलीच्या पारंपरिक पद्धती बंद करून महसूल वसूल करण्यासाठी जिल्हाधिकारी, कंत्राटदार व नव्या नव्या अधिकार्यांची नेमणूक करून मनमानी कारभार केला. आदिवासींची भाषा, परंपरा याबाबत त्यांची वागणूक अनादाराची असे. आदिवासींची व्यवस्था उद्ध्वस्त करून आदिवासींना अन्याने वागवले जात असे. न्यायालयाची पद्धत सुरू करण्यात आली, मात्र न्याय देणारे न्यायाधीश यांना आदिवासींच्या चालीरीतीची माहिती नव्हती. न्यायदानाची भाषा कळत नव्हती. न्यायालय कामकाज उर्दूत किंवा इंग्रजीत चालत असे. इंग्रजी किंवा उर्दू आदिवासींना समजत नसे. जमीनही कंत्राटदारांनी आदिवासींकडून हिसकावून घेतली. गुंतागुंतीच्या कारभाराने आदिवासी समाज असंतोषाने पेटून उठला होता. या परकीय आव्हानाला तोंड देण्यासाठी मुंडाने अनेक प्रकारच्या झुंजी दिल्या. 1789 सालच्या मुंडा जमातीच्या बंडापासून ते 1831-32च्या कोल बंडापर्यंत छोटा नागपूर धुसमुसत राहिले. 1858ला भूमी व आदिवासी समाजाच्या अधिकारांचे रक्षण करीत असता झालेले आंदोलन बिरसा यांच्या मनावर खूप खोलवर प्रभाव पाडून गेले. आदिवासींचे दुःख व समाजावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी व मायभूमीला परकियांच्या तावडीतून सोडवण्यासाठी बिरसा यांनी वाहून घेतले. एका सद्व्यक्तीची भेट झाल्याने बिरसा मुंडा यांनी शिकार करणे थांबवले. ब्रिटिश अधिकार्यांनी 8 ऑगस्ट 1895 रोजी बिरसाला बंदुकीच्या धाकाने पकडण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. त्याच्यासोबत असणार्या 200 आदिवासी तरुणांनी व 800 आदिवासी महिला-पुरुषांनी अटक करण्यास आलेल्या पोलिसांना पळवून लावले. 23 ऑगस्ट 1895ला इंग्रज अधिकार्यांनी बिरसाला झोपेत असताना बेड्या घातल्या. आदिवासींपर्यंत याची माहिती पोहचताच हजारो आदिवासी पोलीस ठाण्यावर चालून आले, मात्र पोलीस बळापुढे त्यांचे काही चालले नाही. हे वृत्त पसरताच वातावरण गंभीर झाल्याने खटल्याचे कामकाज थांबवण्यात आले व खटला रांची येथे चालवण्यात आला. 19 नोव्हेंबर 1895 रोजी दोन वर्षांची सक्तमजुरी व 50 रुपये दंड ठोठावण्यात आला. 1897 साली हजारीबाग तुरुंगातून मुक्तता झाल्यानंतर बिरसा मुंडांनी आदिवासींची फौज उभी केली, तर रेड्याचा बळी देण्याची प्रथाही बंद पाडली. एक सुधारणावादी आंदोलन निर्माण केले. 1898मध्ये अनुयायांची चालकाड येथे सभा घेऊन फौजेत सेनापती, सरसेनापती अशा विविध पदांची निर्मिती केली. या लढाऊ फौजेने इंग्रज अधिकार्यांना सळो की पळो करून सोडले. पोलीस चौक्यांना लक्ष्य करण्यात आले. 9 जानेवारी 1900 या दिवशी झालेला बंड मोडून काढण्यासाठी इंग्रजी फौजांनी आदिवासींवर अत्याचार करीत बिरसाला अटक केली. भेदरलेल्या आदिवासींना भीती घालत त्यांचे धर्मांतर केले. गनिमी काव्याने बिरसा मुंडा नवीन ठिकाणी पोहचत नवीन फौज तयार केली. इंग्रज अधिकार्यांनी गुप्त
माहितीमार्फत पाळत ठेवत बिरसा यांना घेराव घातला. बलदंड असणार्या बिरसांनी अटक करण्यास आलेल्या पोलिसांना ठोशास ठोसा देत प्रत्युत्तर दिले, मात्र मोठ्या संख्येने असणार्या पोलिसांनी बिरसाला पकडून एका लाकडी फळीखाली दाबून ठेवले आणि रांची येथे हलवण्यात आले. काही दिवसांतच बिरसा यांचा मृत्यू झाल्याचे इंग्रज अधिकार्यांनी जाहीर केले.
बिरासांनी आदिवासींना त्यांच्या हक्काची जाणीव करून दिली. वनशुल्क देऊ नका, वेठबिगारी करू नका, जंगलावर आपलाच पहिला अधिकार आहे, तो अधिकार मिळालाच पाहिजे, असे आपल्या प्रत्येक बैठकीत आदिवासींना आवाहन करीत असत. आदिवासीविरोधी कायद्याला आदिवासींनी कडाडून विरोध केला पाहिजे. इंग्रजी अधिकार्यांचे तसेच तत्कालीन न्यायालयाचे आदेश आदिवासींनी मानू नयेत. सेवकपत्र लिहून देऊ नये. लादलेल्या गुलामगिरीचा आदिवासींनी विरोध करावा. स्वराज्यासाठी लढावे. इंग्रजांनी ही भूमी सोडून चालते व्हावे आणि आमचे राज्य संपूर्ण स्वातंत्र्य आमच्या स्वाधीन करावे. या भूमीचे मूळ मालक आम्ही, जंगलाचे धनी आम्ही, मूळ रहिवासी, तरीही आम्ही पराधीन कसे? आमचे संपूर्ण स्वातंत्र्य आम्हाला हवे आहे. आमचे अधिकार आम्हाला हवेत, अशी विचारधारा बिरसा यांनी मांडली. आदिवासी एकजूट ठेवावी. दारू, मांस, मासे खाऊ नयेत. शुद्ध जीवनासाठी शाकाहार करावा. एकच सिंगबोंगा देवाची पूजा करावी. देवस्थानापुढे पशूंना बळी देऊ नका. गायीची सेवा करा. तिला अजिबात त्रास देऊ नका. प्रत्येक पशूपक्ष्याबाबत दयाबुद्धी बाळगा. सर्व प्राणिमात्रांवर प्रेम करा, असे वचन बिरसा यांनी मांडले. बिरसाच्या कथनातील सिंगबोंगा म्हणजे कुठलीही देव प्रतिमा नाही. मंदिर, मशिद, चर्च ही संकल्पना त्यात नाही. त्यांचा सिंगबोंगा म्हणजे निसर्गशक्ती. जीव जगत असलेली स्वयंचलित चैतन्यऊर्जा. वनस्पतीचा प्रभावी वापर करून तो आजार व रोग दुरुस्त करीत असे. चांगल्या आरोग्यासाठी त्याचा लाभ होई. आदिवासी लोकांचा विश्वास त्यांनी संपादन केला होता. 9 जून 1900 रोजी रांची कारागृहात संशयास्पद मृत्यू झालेल्या बिरसांच्या स्मरणार्थ शहीद दिन पाळला जातो.
महात्मा गांधींच्या कायदेभंगाच्या चळवळीत चिरनेर उरण येथील ब्रिटिशांच्या गोळीबारात ठार झालेल्या नाग्या महादू कातकरी. हुतात्मा स्मारकात नाव कोरले नव्हते. आदिवासी तरुणांनी 9 ऑगस्ट 2001ला धडक देत नावाची पाटी लावायला भाग पाडले. अनेक लढ्यातील पुरावे सादर करून 25 सप्टेंबर 2001ला हुतात्मा दिनाला हुतात्मा स्तंभावर नाग्या महादू कातकरीचे नाव कोरले गेले. कायदेभंगाची चळवळ दांडीयात्रा सुरू झाली. चिरनेर उरण येथे आयोजन करण्यात आले. जंगल वापराला ब्रिटिशांनी विरोध केला. या कायद्याला विरोध करीत सत्याग्रह होऊ लागले. 25 सप्टेंबर 1930ला कुलाबा आताचा रायगड जिल्हा जाकादेवी माळावर देशभक्तांनी भारतीय स्वातंत्र्याच्या घोषणा देत महात्मा गांधींच्या नावाचा जयजयकार करीत जंगलावर आपली हत्यारे चालवली. आंदोलकांचा आक्रमक पवित्रा बघून ब्रिटिश अधिकार्यांनी तत्कालीन मामलेदार जोशी यांना आंदोलनकर्त्यांवर गोळीबार करण्याचा आदेश फर्मावला, मात्र मामलेदार जोशी स्वातंत्र्यप्रेमी होते. त्यांनी आदेश पाळला नाही. परिणामी ब्रिटिश अधिकार्याने आपल्याजवळील पिस्तुलाने मामलेदार जोशीच्या शरीराची चाळण केली. सत्याग्रहींना ताबडतोब मागे फिरा अन्यथा तुमचीही गत अशीच होईल म्हणून फर्मान काढले, परंतु सत्याग्रहीमधील 20 तरुणांचा गट समोर येत आपल्याजवळील लखलखती हत्यारे काढली. ती हत्यारे ब्रिटिश अधिकार्यांवर चालवली नाहीत तर समोरच्या जंगलावर चालवली. कारण अहिंसेवर सत्याग्रहींचा विश्वास होता. भारतीय स्वातंत्र्याचा जयघोष सत्याग्रही आक्रमक पाहून चिडलेल्या ब्रिटिश अधिकार्याने गोळीबार करीत 12 सत्याग्रहींना यमसदनी पाठवले. 21 वर्षांच्या नाग्या महादू कातकरी हाही शहीद झाला, मात्र शहिदांच्या स्मृतीस्तंभावर नाव नसल्याने आदिवासी बांधवांनी अनेक उठाव केले होते. 25 सप्टेंबर 2001 रोजी हुतात्मा नाग्या महादू कातकरीचे नाव लिहिले गेले.
दुसरे महायुद्ध सुरू झाल्याचा तो काळ. भारतात असहकार आंदोलन, भारत छोडो ही आंदोलने होत होती. आदिवासी पादलमन जमातीत जन्मलेल्या लक्ष्मण नायक यांनी स्वातंत्र्यसंग्रामात स्वतःला झोकून दिले. 29 मार्च 1943ला लक्ष्मण नायक यांना बरहंपूर तुरुंगातच खोटे आरोप ठेवून फासावर लटकवण्यात आले. 1781ला आदिवासींचा ब्रिटिश सत्तेशी संघर्ष सुरू झाला होता. तिलक मांझीनी 10 वर्षे ब्रिटिश सत्तेविरुद्ध लढा दिला. एका बाजूला धनुष्यबाण आणि विरोधात बंदुका व तोफा अशा लढ्यात तिलक मांझी यांनी केवळ स्वतःची आहुती दिली नाही तर या लढ्यात त्यांचे चार भाऊ व पत्नी यांनीही हौतात्म्य पत्करले. 1945-46 डहाणू उंबरगाव तालुक्यात वारले यांचे आंदोलन सुरू होते. याच काळात ध्येयवादाने प्रेरित व्यक्ती गोदावरीताई परुळेकर यांनी अनेक कष्ट सोसून आदिवासींना न्याय मिळवून दिला. बिहारमधील पाहाडिया सरदारांचा लढा, 1785 मुंबईतील महादेव कोळी जमातीचा इंग्रज सरकारविरुद्ध लढा संघर्ष, 1818 महाराष्ट्रातील महादेव कोळी जमातीचा इंग्रजांविरुद्ध उठाव, ओरिसा, बिहार, गुजरात, आसाम ते महाराष्ट्रातील 1848 अहमदनगर जिल्ह्यातील क्रांतिवीर राघोजी भांगरे यांचे इंग्रजांविरुद्ध बंड, 1939 पुणे जिल्ह्यातील सह्याद्रीच्या शिवनेर मावळा महादेव कोळी बंडखोरांचा सरकार व सावकारांशी झालेला संघर्ष कोंड्या नवल्याचे बंड या नावाने ओळखले जाते. अशा अनेक बंडात व स्वातंत्र्ययुद्धात आदिवासी समाजाचे महत्त्व सर्वांत जास्त आहे.
-अरूण नलावडे, फिरस्ती