महाड : प्रतिनिधी
अतिवृष्टी व पुरामुळे महाड तालुक्यात झालेल्या नुकसानीची शुक्रवारी
(दि. 30) केंद्रीय पथकाकडून पाहणी करण्यात आली. या पथकाने महाड शहर, वरंध घाट व शेवते येथे पाहणी केली.
महाड शहरासह औद्योगिक क्षेत्र, तसेच शहराजवळील गावांत पुराचे पाणी शिरल्याने मोठी वित्तहानी झाली. व्यापार्यांची दुकाने आणि नागरिकांच्या घरात पाणी शिरून साहित्याचे नुकसान झाले. भातशेतीतही पुराचे पाणी घुसल्याने पीक कुजून गेले आहे. या नुकसानीचे पंचनामे शासनाकडून झाले असून, काहींना मदत मिळाली, पण बहुतेक शेतकरी आणि पूरबाधितांना अद्याप मदत दिली गेलेली नाही. या पार्श्वभूमीवर नुकसानग्रस्त भागाची केंद्रीय पथकाकडून पाहणी करण्यात आली.
या वेळी नवी दिल्ली येथून चित्तरंजन दास, मिलिंद पानपाटील आदींच्या पथकाने महाड शहरातील काही भागांत जाऊन दुकानदारांशी चर्चा केली. शहरात असलेल्या पुराच्या पाण्याच्या पातळीची नोंददेखील त्यांनी पहिली. या केंद्रीय पथकाबरोबर रायगडचे जिल्हाधिकारी विजय सूर्यवंशी, महाडचे तहसीलदार चंद्रसेन पवार हेही उपस्थित होते.