14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती असलेल्या गणरायाचा महिमा अगाध आहे. विविध नावांनी तो ओळखला जातो. दरवर्षी बाप्पाचा उत्सव भाद्रपद शुद्ध चतुर्थीला संपूर्ण महाराष्ट्रासह देशाच्या काही भागांत हर्षोल्हासाने साजरा केला जातो. दीड, पाच, दहा दिवस अशी त्याची घरगुती आणि सार्वजनिक स्वरूपात प्रतिष्ठापना केली जाते. साता समुद्रापार परदेशातदेखील भक्त श्रीगणेशाची स्थापना करून त्याची आराधना करतात. या काळात बाप्पाची श्रद्धेने व भक्तिभावाने पूजा-अर्चा केली जाते. तेव्हा सगळीकडे ‘गणपती बाप्पा मोरया’चा जयजयकार निनादतो.
स्वातंत्र्यपूर्व काळात नागरिकांनी जुलमी ब्रिटिशांविरुद्ध एकत्र यावे, या उदात्त भावनेने लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव सुरू केला. हा प्रयोग कमालीचा यशस्वी झाला आणि आज इतक्या वर्षांनंतरही या उत्सवाची लोकप्रियता तसूभरही कमी झाली नाही. काळानुरूप या उत्सवाचे स्वरूप बदलले असले तरी तो साजरा करण्यामागचा उद्देश तोच आहे एकतेचा.
यानिमित्ताने नोकरी-व्यवसायामुळे दूर असलेले कुटुंबातील सदस्य, सगे-सोयरे, आप्तगण, तसेच मित्रपरिवार हमखास एकत्र येतात. ही या गजाननाची कृपादृष्टी आहे, असे आवर्जून नमूद करावेसे वाटते.
गणेशोत्सवाची कोकणात आगळी धूम असते. पावसाळा सुरू झाला की कोकणी माणसाला या उत्सवाची चाहूल लागते. बाहेरगावी असलेला चाकरमानी गणेशोत्सवासाठी न चुकता गावी येतोच. अशा वेळी भजन, नृत्य अशा परंपरांना उजाळा मिळतो. या दिवसांत कुणाच्या घरी जाण्यासाठी आमंत्रणाची गरज नसते. अख्खे गाव एका कुटुंबाप्रमाणे नांदते. मंगलमय वातावरणात सर्व जण श्रीगणेशाच्या ओढीने एकत्र येतात आणि या धार्मिक कार्यात निष्ठेने सहभागी होतात. गणपतीनंतर काही दिवसांनी गौरीचे आगमन होते. गौरी पूजनाचा सोहळाही पाहण्यासारखा असतो. या दिवसाची माहेरवाशिणींना ओढ लागलेली असते. घरातील महिलावर्ग गौराईला वस्त्रालंकाराने सजवितात. मग तिचे रूप अधिकच खुलते. असा घराघरांत दिमाखात साजरा होणारा हा उत्सव प्रत्येक कोकणवासीयाचा सांस्कृतिक ठेवाच आहे. खरंतर गणेशोत्सव सर्वत्रच त्या त्या पद्धतीने जोरदारपणे साजरा होत असतो.
यंदा राज्यात अतिवृष्टीने होत्याचे नव्हते करून टाकले. विशेषत: पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, सांगलीत महापुराने अक्षरश: दैना उडविली. कोकण, विदर्भातही पावसाने हाहाकार माजविला. आता पुन्हा वरुणराजा बरसू लागला आहे. मानवाने निसर्गाशी छेडछाड केल्याने पर्यावरणाचे संतुलन बदलून प्रलयासारख्या आपत्ती ओढवत आहेत. ते पाहता पर्यावरणाची काळजी घेण्यासाठी गणरायानेच बुद्धी द्यायला हवी.
आनंदाची बाब म्हणजे हल्ली पर्यावरणपूरक गणेशोत्सवाकडे अनेकांचा कल वाढला आहे. प्लास्टिक, थर्माकोलमुळे पर्यावरणाला हानी पोहोचते. प्लास्टिकचे तर विघटनच होत नाही. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्तीही पाण्यात पूर्णपणे विरघळत नाहीत. ते लक्षात घेता एक पाऊल परमार्थाकडून पर्यावरणाकडे टाकणे काळाची गरज बनली आहे. त्याचा ‘श्रीगणेशा’ यंदाच्या गणेशोत्सवापासून करू या! बोला गणपती बाप्पाऽऽ मोरया..!!
-समाधान पाटील मो. क्र. 9004175065