माऊली जगदाडेने जिंकली आव्हानाची कुस्ती
अलिबाग : प्रतिनिधी
अलिबाग तालुक्यातील मांडवा येथे टाकादेवी स्पोर्ट्स क्लब आणि ग्रामस्थ यांच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत भिवंडी चौधरीपाडा आखाडा प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला. शिवाजी व्यायामशाळा आंदोशी अलिबागने द्वितीय, तर जय हनुमान तालिम संघ वाडगाव अलिबागने तृतीय क्रमांक पटकाविला. अंतिम आव्हानाची कुस्ती कोल्हापूरचा आंतरराष्ट्रीय पैलवान माऊली जगदाडेने जिंकली.
स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा पोलीस अधिक्षक अशोक दुधे यांच्या हस्ते झाले. या वेळी प्रमुख अतिथी म्हणून आमदार महेंद्र दळवी, आई फाउंडेशनचे अध्यक्ष राजू साळुंके, माजी सभापती दिलीप भोईर, अमित नाईक, सागर पवार, जयेंद्र भगत, प्रमोद भगत, राजा ठाकूर, सुरेंद्र म्हात्रे, प्रमोद दळवी, अभिजित राणे, रणजित राणे, सुधीर म्हात्रे, अनिल पाटील, सचिन म्हात्रे तसेच सरपंच, उपसरपंच, सदस्य, विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी व प्रेक्षकांची मोठी गर्दी होती.
स्पर्धेत रायगड, ठाणे, कोल्हापूर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूरसह हरियाणा, दिल्ली येथील कुस्तीपटूंचा समावेश होता. या वेळी लहान व मोठ्या वयोगटातील सुमारे दोनशेहून अधिक कुस्त्या खेळविण्यात आल्या. अंतिम विजेत्यांना चषक व रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले.