गणेशभक्तांना मोठा दिलासा
मुंबई : प्रतिनिधी
सात दिवसांच्या गौरी-गणपतींचे विसर्जन होणार असल्याने येत्या रविवारी (दि. 8) पश्चिम, मध्य आणि हार्बर रेल्वेमार्गावरील मेगाब्लॉक रद्द करण्यात आला आहे. गणेशभक्तांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे, तसेच गणेश दर्शनासाठी मुंबईत जाणार्या प्रवाशांसाठी आणि भक्तांसाठी रात्री उशिरा विशेष लोकल सोडण्यात येणार आहेत, अशी माहितीही रेल्वे प्रशासनाने दिली. गणेशोत्सवामुळे मध्य रेल्वेच्या मेन आणि हार्बर मार्गावर घेण्यात येणारा रविवारचा मेगाब्लॉक रद्द करण्यात आला आहे, अशी माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी दिली. हजारो भाविक या दिवशी मुंबईतील विविध भागांतील गणरायांचे दर्शन घेण्यासाठी येतात. या सर्वांची गैरसोय होऊ नये म्हणून रविवारी नियमित घेण्यात येणारा मेगाब्लॉक रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती रेल्वेच्या अधिकार्यांनी दिली. या काळात मध्य रेल्वेकडून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते ठाणे-कल्याण आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते पनवेल या मार्गांवर शनिवारी रात्री आणि 12 सप्टेंबर रोजी रात्री 20 विशेष लोकल चालविण्यात येणार आहेत. या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते ठाणे-कल्याण या मार्गावर पहाटे 3.30 वाजता, तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते पनवेल या मार्गावर पहाटे 2.45 वाजता शेवटच्या लोकल सोडण्यात येतील. गणेश विसर्जनादरम्यान पश्चिम रेल्वेवरही शनिवारी रात्री आणि 12 सप्टेंबरच्या रात्री चर्चगेट-विरार मार्गावर चार विशेष लोकल चालविण्यात येणार आहेत. चर्चगेटहून शेवटची विशेष लोकल पहाटे 3.20 वाजता विरारसाठी, तर विरारहून शेवटची विशेष लोकल पहाटे 3 वाजता सुटेल, अशी माहिती पश्चिम रेल्वेच्या सूत्रांनी दिली.