पनवेल महानगरपालिकेचा निर्णय
पनवेल ः रामप्रहर वृत्त
पनवेल महापालिकेच्या विविध वास्तूंना ऐतिहासिक नावे देण्याचा निर्णय आयुक्त गणेश देशमुख यांनी घेतला असून, अशा प्रकारची संकल्पना राबवणारी ही राज्यातील पाहिलीच महानगरपालिका ठरणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या मंत्रिमंडळातील प्रमुख मंत्र्यांच्या बंगल्यांना विविध नावाने ओळखले जाते. त्याच धर्तीवर पनवेल महापालिकेचे मुख्यालय, आयुक्त निवास, महापौर निवास तसेच प्रभाग कार्यालये भविष्यात ओळखली जाणार आहेत.
रायगड जिल्ह्याला ऐतिहासिक महत्त्व असून, पनवेल महापालिका जिल्ह्यातील पहिली आणि एकमेव महापालिका आहे. ऐतिहासिक वारसा जपण्याच्या दृष्टीने पालिकेच्या महत्त्वाच्या वास्तूंना ऐतिहासिक नावे देण्याची संकल्पना आयुक्त गणेश देशमुख यांनी राबविली आहे. पनवेल महापालिकेच्या मुख्यालयाला स्वराज्य नाव देण्यात आले आहे. याच प्रकारे महापौर बंगल्याला शिवनेरी तर आयुक्त बंगल्याला राजगड हे नाव देण्यात आले आहे. पालिकेचे प्रभागनिहाय कामकाज ज्या प्रभाग कार्यालयातून चालते, त्या पालिकेच्या अ, ब, क, ड या चार प्रभाग कार्यालयांना विजयदुर्ग, जलदुर्ग, सिंधुदुर्ग, पद्मदुर्ग आदी नावे देण्यात आली आहेत. रायगड जिल्ह्याला ऐतिहासिक वारसा लाभला आहे. हे ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेता भावी पिढीला आपला अमूल्य इतिहास लक्षात राहावा, या दृष्टीने पनवेल महारपालिकेने उचललेले पाऊल कौतुकास्पद आहे.