पनवेल ः वार्ताहर
पनवेल-पुणे हायवेवरील हॉटेल वेलवेट ट्रीटमध्ये कायद्याचे उल्लंघन करून परवानगीपेक्षा अधिक वेळ म्हणजेच पहाटेपर्यंत हॉटेल्स सुरू ठेवले जाते. पहाटेपर्यंत हे हॉटेल चालू असल्याने या ठिकाणी अनेक गँगस्टर रात्री अपरात्री मद्य प्राशन करण्याकरिता येत असल्याने हे हॉटेल बहुचर्चित झाले आहे. तर या हॉटेलमधीलच लॉजिंगमध्येच देहव्यापार खुलेआम चालत असल्याने गावातील महिला वर्गाने आक्षेप घेत येथील लॉजिंगचा परवाना रद्द करण्यात यावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या नियमाप्रमाणे परमिट रूमकरिता दिलेल्या वेळेपेक्षा अगदी पहाटेपर्यंत या ठिकाणी मद्यविक्री होत असते, तर या ठिकाणी असलेल्या लॉजिंगमध्ये कोन परिसरातील लेडीज बारमधील अनेक बारबाला येत असल्याचे विश्वासनीय सूत्रांकडून समजते. – कोन-कोळखे हा परिसर लेडीज बारकरिता कुप्रसिद्ध असून, या ठिकाणचे काही लेडीज सर्व्हिस बार रात्री 10 वाजता बंद होतात, तर काही ऑर्केस्ट्रा बार मध्यरात्री दीड वाजता बंद झाल्यानंतर बारबाला हॉटेल वेलवेट ट्रीटमधील लॉजिंगमध्ये देहविक्रीसाठी येतात. याच हॉटेलमधील ग्राहक जेवणासाठी व आपले शौक पूर्ण करण्यासाठी सर्व बार बंद झाल्यानंतर हॉटेल वेलवेट ट्रीटमध्ये येत असल्याचे समजते.