सोलापुरात राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांचा राजीनामा
सोलापूर ः प्रतिनिधी
विधानसभेच्या निवडणुका जवळ येत असल्याने सत्तेतील पक्षांमध्ये जाणार्यांची संख्या वाढली आहे. पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानल्या जाणार्या सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादीला लागलेली गळती सुरूच आहे. दिलीप सोपल आणि रश्मी बागल यांच्यानंतर माजी आमदार दीपक साळुंखे यांनीही पक्षाला रामराम ठोकला आहे. सोलापूर जिल्हा राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार दीपक साळुंखे यांनी आपला जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा पत्राद्वारे दिला. माजी आमदार दीपक साळुंखे हे जिल्ह्यातील शरद पवारांचे अत्यंत विश्वसनीय व कट्टर समर्थक मानले जातात, मात्र साळुंखे यांच्या राजीनाम्याने राष्ट्रवादीला खिंडार पडले. माढ्याचे राष्ट्रवादीचे पवारनिष्ठ आमदार बबनराव शिंदे व त्यांचे बंधू तथा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांच्यासह अक्कलकोटचे काँग्रेसचे आमदार सिध्दाराम म्हेत्रे व पंढरपूरचे काँग्रेसचे आमदार भारत भालके यांच्या संभाव्य राजकीय निर्णयाविषयीही उत्सुकता वाढलीय.
गेल्या काही दिवसांपासून दीपक साळुंखे हे राष्ट्रवादीमध्ये नाराज असल्याचे दिसून येत होते. नुकत्याच झालेल्या शिवस्वराज्य यात्रेदरम्यानदेखील त्यांची बेचैनी सर्व कार्यकर्त्यांना दिसून येत होती. विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीवेळी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगोल्यातील मताधिक्यासाठी दीपक साळुंखे यांच्या डोक्यावरील केसदेखील काढून टिंगल केली होती.