आमदार महेश बालदी यांची मागणी
पनवेल : रामप्रहर वृत्त
कोन-सावळे आणि दांडफाटा तुराडेमार्गे आपटा खारपाडा या रस्त्यांचे काम केंद्रीय मार्ग निधी अंतर्गत प्रस्तावित करून त्यास मंजुरी द्यावी, अशी मागणी उरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांनी राज्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अतिरिक्त सचिव यांच्याकडे केली आहे. या संदर्भात आमदार बालदी यांनी निवेदन दिले असून, या रस्त्यांच्या बिकट अवस्थेकडे शासनाचे लक्ष वेधले आहे.
आमदार बालदी यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दांडफाटा-तुराडे-आपटा-खारपाडा रा. मा. 107 आणि कोन-सावळे महामार्ग क्र. 105 हे दोन्ही रस्ते राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 (मुंबई-पुणे) व राष्ट्रीय महामार्ग क्र. 66 (मुंबई-गोवा) यांना आणि पातळगंगा औद्योगिक क्षेत्रास जोडणारे मुख्य रस्ते आहेत. या रस्त्यांच्या आजूबाजूला कंटेनर यार्ड्सची संख्या वाढल्यामुळे अवजड वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असते. त्यामुळे कोन-सावळे रस्ता रा. मा. 105चे संपूर्ण लांबीमध्ये काँक्रीटीकरण करणे व दांडफाटा-तुराडे-आपटा-खारपाडा रस्ता
रा. मा. 107च्या गावामधून जाणार्या लांबीचे काँक्रीटीकरण करणे व उर्वरित लांबीचे डांबरी नूतनीकरण करणे आवश्यक आहे. कोन-सावळे रस्त्यासाठी अंदाजे 55 कोटी रुपये, तर दांडफाटा-खारपाडा रस्त्यासाठी 25 कोटी रुपये खर्च अपेक्षित असून, या कामासाठी केंद्रीय मार्ग निधी अंतर्गत प्रस्तावित करून मंजुरी मिळावी.