Breaking News

…तरच महाराष्ट्राची नव्याने उभारणी करता येईल -जाधव

सिडकोतर्फे शिवजयंती सोहळा उत्साहात

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त

शिवरायांनी स्थापलेल्या स्वराज्याच्या अनेक उद्दिष्टांपैकी महत्त्वाचे उद्दिष्ट म्हणजे ‘रयतेस पोटास लावणे’ हे होते. त्याच अनुषंगाने आजच्या राज्यकर्त्यांनीदेखील ‘रिकाम्या डोक्याला विचार व मोकळ्या हाताला काम’ या शिवरायांच्या तत्त्वास अनुसरून प्रशासन केल्यास महाराष्ट्राची नव्याने उभारणी करता येईल, असे मत जिजाऊ माँसाहेब यांचे वंशज, लेखक, वक्ता तथा उद्योजक प्रा. नामदेवराव जाधव यांनी  व्यक्त केले. सिडको भवनमध्ये आयोजित करण्यात आलेल्या श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती सोहळ्यासाठी ते उपस्थित होते.

सिडको कर्मचारी संघटनेतर्फे  सिडको भवन येथे श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याचा आरंभ शिवचरित्रावर आधारित लेजर शो व विठू माऊलीला नृत्याराधनेतून वंदन करून झाला.या सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून शिवाजी महाराजांचे वंशज श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे शाहूमहाराज राजे भोसले यांनी उपस्थिती दर्शवली. कार्यक्रमाचे अध्यक्षपद सिडकोचे मुख्य अभियंता (नवी मुंबई)  केशव वरखेडकर यांनी भूषविले. कार्यक्रमास मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. बी. एस. बावसकर, व्यवस्थापक (कार्मिक) विद्या तांबवे, सिडको कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष निलेश तांडेल, सिडको कर्मचारी संघटनेचे उपाध्यक्ष  विनोद पाटील, सिडको कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस जे. टी. पाटील, सिडको बी.सी. एम्प्लॉईज असोसिएशनचे अध्यक्ष मिलिंद बागूल, सिडको बी.सी. एम्प्लॉईज असोसिएशनचे सरचिटणीस  नरेंद्र हिरे व सिडकोचे कर्मचारी- अधिकारी यांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थिती दर्शविली.शिवाजी महाराजांच्या प्रशासनातील आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे कोणत्याही कामाची अंमलबजावणी तत्काळ करणे. आजच्या भाषेत त्याला ‘झीरो पेन्डन्सी’ म्हणता येईल, असे उद्गार प्रा. जाधव यांनी काढले. आजचे काम आजच झाले पाहिजे असा महाराजांचा शिरस्ता असल्याने त्यांच्या प्रशासनात सुसूत्रता होती. आजदेखील ‘झीरो पेन्डन्सी’ या तत्त्वाचा प्रशासनात वापर केला तर त्याचा राज्याच्या प्रगतीमध्ये मोठा हातभार लागेल, असे मत प्रा. जाधव यांनी व्यक्त केले.

आजची युवा पिढी हे उद्याचे भविष्य आहे. ज्याप्रमाणे आजची युवा पिढी घडेल त्यानुसारच आपला देश घडेल. थोडक्यात आपल्या देशाचे भविष्य आजच्या युवा पिढीच्या हातात आहे आणि जर देशाचे भविष्य उज्ज्वल करायचे असेल तर आजच्या प्रत्येच तरुण-तरुणीने शिवचरित्र वाचून त्यातील महाराजांचे आचार-विचार, तत्त्व व गुण अंगीकृत करणे अत्यंत गरजेचे आहे, असे मत श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे शाहू महाराज राजे भोसले यांनी व्यक्त केले.

शिवजयंतीच्या या सोहळ्याला सिडकोतील अधिकारी-कर्मचार्‍यांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थिती दर्शवली. अत्यंत उत्साहात व शिवाजी महाराजांच्या जयजयकारात सिडको भवन येथील शिवजयंतीचा सोहळा पार पडला.

Check Also

कामोठ्यात शनिवारी ’मा. श्री. परेश ठाकूर केसरी’ भव्य कुस्त्यांचे जंगी सामने

पैलवान देवा थापा आणि नवीन चौहान यांची बिग शो मॅच होणार पनवेल ः रामप्रहर वृत्त …

Leave a Reply