48 नगरसेवकांसह गणेश नाईक भाजपमध्ये
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व राज्याचे माजी मंत्री गणेश नाईक यांनी पुत्र माजी खासदार संजीव नाईक आणि 48 नगरसेवकांसह बुधवारी (दि. 11) भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सर्वांचे स्वागत केले.
वाशी येथील सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये झालेल्या पक्षप्रवेश सोहळ्यास राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, खासदार कपिल पाटील, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, सिडको अध्यक्ष तथा भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, प्रवीण दरेकर, किसन कथोरे, प्रसाद लाड, मंदा म्हात्रे, नरेंद्र पाटील, संजय केळकर, निरंजन डावखरे, रमेश पाटील, महापौर जयवंत सुतार, माजी महापौर सागर नाईक आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या वेळी मुख्यमंत्री आपल्या भाषणात म्हणाले की, सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार मंदा म्हात्रे चांगल्या पद्धतीने काम करीत आहेत. आता गणेश नाईक भाजपमध्ये आले. त्यामुळे भाजपची नवी मुंबईतील चिंता मिटली आहे. जे काही प्रश्न प्रलंबित आहेत ते सरकार निश्चितपणे मार्गी लावेल.
गणेश नाईक यांनी मनोगतात सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामुळे जगभरात आपल्या देशाची मान उंचावली. अनुच्छेद 370 काश्मीरमधून रद्द करण्याचा धाडसी निर्णय आणि इतर अनेक चांगले निर्णय या सरकारने घेतले, तर मागील पाच वर्षांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचा खूप चांगल्या प्रकारे विकास केला, असेही त्यांनी नमूद केले.