
कीटकनाशकांचे दुष्परिणाम सर्वांना कळून चुकले आहेत. विशेषतः भाज्यांवर अतिप्रमाणात कीटकनाशके फवारणे धोकादायक असते. आता किडे आणि पतंगांच्या बंदोबस्तासाठी कीटकनाशकांचा वापर करावा लागणार नाही, असे तंत्र लो प्लास्टिक टनेलच्या रूपाने शेतकर्यांच्या हातात आहे. बिगरमोसमी पिके घेणेही यामुळे शक्य झाले असून, त्यामुळे हे तंत्र शेतकर्यांसाठी वरदान ठरले आहे.
पिकांवर विशेषतः भाजीपाला पिकांवर फवारण्यात येणार्या कीटकनाशकांच्या दुष्परिणामांविषयी आता सर्वांनाच माहिती आहे. भाजीपाला आणि इतर पिके तयार झाल्यावर त्यांना कीटक आणि पतंगांपासून वाचविण्यासाठी मोठा खर्च होतो. कारण शेतकरी त्यासाठी कीटकनाशकांचा मोठ्या प्रमाणावर वापर करतात. यावर एक सोपा पर्याय असून, त्यामुळे कीटकनाशकांचा दुष्परिणाम टाळण्याव्यतिरिक्त खर्चातही कपात करता येते. प्लास्टिक लो टनेल असे या तंत्राचे नाव आहे. या तंत्रज्ञानाचा वापर केल्यास होणारा अतिरिक्त फायदा म्हणजे शेतकरी कोणत्याही हंगामात एखादी भाजी पिकवू शकतो. हंगाम नसतानाही पिकणार्या या भाज्या कीडरहित असतात आणि किडींच्या नायनाटासाठी कीटकनाशकांची गरज भासत नाही. लो टनेलमध्ये बियाणे तयार करून शेतकरी ते पॉली हाऊस, ग्रीन हाऊस किंवा शेडनेटमध्ये लावू शकतात. ही यंत्रणा उभारण्याची शेतकर्याची ऐपत नसेल तरी या तंत्रज्ञानाच्या साह्याने तो शेती करू शकतो. अर्थात खुल्या जमिनीत अशा प्रकारची शेती करणे बर्याच अंशी धोकादायक ठरते. भाजीपाल्याच्या पिकांमध्ये अंधाधुंद पद्धतीने कीटकनाशकांचा वापर केला जातो. त्यामुळे भाज्यांमध्ये चक्क विषारी घटक मिसळले जातात.
भाज्या खाणार्यांच्या आरोग्यासाठी हे घटक अत्यंत अपायकारक असतात. त्याचबरोबर भाज्यांची चवही या घटकांमुळे बिघडते. या बाबींची गंभीर दखल घेऊन सरकारने राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत टोमॅटोचे पीक घेणार्या शेतकर्यांच्या शेतात लो टनेलचा वापर करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
या तंत्रात अर्ध चंद्राकृती वाकविलेल्या लोखंडाच्या जाड तारा जमिनीत दोन्ही बाजूंनी दाबून मच्छरदाणीसारख्या कापडाचे त्यावर आच्छादन तयार केले जाते. या मच्छरदाणीत कीटक आणि पतंग प्रवेश करू शकत नाहीत. गरजेच्या वेळी हे आच्छादन हटवून पिकांची काळजी घेतली जाते. त्यावर वेगवेगळ्या प्रक्रिया केल्या जातात आणि पुन्हा हे आच्छादन वरून अंथरले जाते. पिकाला शेणखत किंवा कम्पोस्ट खत घातले जाते. भाजीपाल्याच्या पिकांसाठी लो टनेलचा वापर केल्यानंतर शेतात कीटकनाशकांचा वापर करण्याची गरजच उरत नाही. परिणामी शेतकर्यांचा खर्च वाचतो. प्लास्टिक लो टनेलचा वापर केल्यामुळे आणखी एक फायदा शेतकर्यांना मिळू शकतो. तो म्हणजे भाज्यांची बिगरमोसमी पिके घेता येणे शेतकर्यांना शक्य होते.
ज्या भाज्या हिवाळ्यात पिकविल्या जातात, त्याच उन्हाळ्यातही घेता येणे शक्य असते. लो टनेलसाठी ज्या तारांचा वापर केलेला असतो, त्यावर मच्छरदाणीसारख्या कपड्याऐवजी उन्हाळ्यात पॉलिथिनचा कागद अंथरल्यास तापमान नियंत्रित करता येते आणि रोपांसाठी हिवाळ्यासारखे वातावरण निर्माण होते. अशाच प्रकारे पावसाळ्याच्या दिवसांत अतिरिक्त पाण्यापासून बचाव करण्यासाठी पॉलिथिन कागद अंथरल्यास आवश्यकतेप्रमाणेच पाणी रोपांना मिळते आणि हिवाळी भाज्या पावसाळ्यातही पिकविता येतात. लो टनेलचा तिसरा महत्त्वाचा फायदा म्हणजे कीटकनाशकांचा वापर अजिबातच न केल्यामुळे या तंत्राने पिकविलेल्या भाज्यांमध्ये विषारी अंश तर नसतातच, शिवाय या भाज्या चविष्ट आणि पौष्टिक असतात.
कीटकनाशकांचा अंश या भाज्यांमध्ये नसल्यामुळे त्यांच्या पोषणतत्त्वांमध्ये अजिबात घट होत नाही. म्हणजे कीटकनाशक औषधांमध्ये असलेले विषारी अंश भाज्यांच्या माध्यमातून जेव्हा आपल्या पोटात पोहचतात, तेव्हा त्वचारोगांपासून कर्करोगापर्यंत अनेक आजारांना निमंत्रण मिळते. याखेरीज जेव्हा कीटकनाशके फवारली जातात, तेव्हा वार्याच्या दिशेचा अंदाज आला नाही, तर शेतकर्यांनाही त्यामुळे धोका निर्माण होऊ शकतो.
फवारणी करताना कीटकनाशकांचे जे अंश हवेत मिसळतात, त्यामुळे हवेचे प्रदूषण होत असते. सध्या पर्यावरणाचा समतोल ढासळत चालला असून, वेगवेगळ्या मार्गांनी प्रदूषके हवेत मिसळत असतात. अशा वेळी कीटकनाशकांच्या माध्यमातून हवेत मिसळणारी प्रदूषके आपण लो टनेलसारखी तंत्रे वापरून रोखू शकतो. त्यामुळे आपोआपच पर्यावरण रक्षणाचे काम शेतकर्यांच्या हातून घडेल.
सर्वच फायदे एकाच वेळी मिळत असल्यामुळे सरकारही लो टनेल तंत्रज्ञान शेतकर्यांनी वापरावे यासाठी आग्रही आहे. ज्या शेतकर्यांना एक ते पाच एकरपर्यंतच्या क्षेत्रात लो टनेल पॉली हाऊस उभे करायचे आहे, त्यांना त्यासाठी अनुदान देण्याचा विचार सरकारकडून केला जात आहे.
कृषी विज्ञान केंद्राकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार लो टनेल तंत्रामुळे सर्व प्रकारच्या किडी आणि पतंगांपासून भाज्यांच्या पिकांचा बचाव करता येणे शक्य आहे. त्याचप्रमाणे हिवाळी ऋतूत पिकणार्या भाज्या उन्हाळी हंगामात आणि पावसाळी ऋतूत येणार्या भाज्या हिवाळ्यात घेता येणे शक्य आहे. यासाठी लो टनेलवर पॉलिथिन कागद अंथरणे आवश्यक आहे.
-विलास कदम