बांगलादेशला नमवून सातव्यांदा चषक जिंकला
कोलंबो : वृत्तसंस्था
19 वर्षांखालील आशिया चषकावर भारतीय संघाने आपले नाव कोरले आहे. भारत आणि बांगलादेश या दोन्ही देशांमध्ये अखेरचा सामना शनिवारी (दि. 14) कोलंबो येथे रंगला. भारताचा डाव बांगलादेशाने 106 डावात गुंडाळल्यानंतर हे लक्ष्य बांगलादेश सहज पार करेल आणि आशिया चषक जिंकेल अशीच शक्यता वाटत होती, पण मुंबईकर अथर्व अंकोलेकरने 28 धावांच्या मोबदल्यात बांगलादेशचे पाच बळी टिपले. त्यामुळे भारताचा विजय साकार झाला. भारताने सातव्यांदा आशिया चषक पटकाविला आहे.
भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. सुरेश पारकर 4 धावा करून बाद झाला, अर्जुन आझाद शून्यावर, तर तिलक वर्मा 2 धावांवर बाद होऊन अवघ्या आठ धावांमध्ये तंबूत परतले. कर्णधार ध्रुव जुरेलने 33 धावा करून संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. शाश्वत रावतने 19 धावा करून त्याला साथ दिली. तरीही टीम इंडियाला धावफलकावर शंभरीही गाठता आली नव्हती. अशात करण लालने अखेरच्या षटकांमध्ये फटकेबाजी करून 37 धावा केल्या त्यामुळे संघाला धावफलकावर 106 धावांपर्यंत मजल मारता आली. भारताचा पूर्ण संघ 32.4 षटकामध्ये 106 धावा करून बाद झाला.
आता 106 धावांचे लक्ष्य बांगलादेश सहज पार करेल आणि आशिया चषकावर आपले नाव कोरेल असे वाटले होते, मात्र अथर्वच्या भेदक मार्यापुढे बांगलादेशची फलंदाजी ढेपाळली. 28 धावांच्या मोबदल्यात अथर्वने बांगलादेशचे पाच बळी टिपले आणि त्यामुळे भारताच्या विजयाची वाट सुकर झाली.