इस्लामाबाद : वृत्तसंस्था
जम्मू-काश्मीरला लागू असलेले कलम 370 रद्द करण्याच्या भारत सरकारच्या निर्णयानंतर पाकिस्तान सातत्याने युद्धाच्या धमक्या देत आहे, मात्र पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांनी स्वत:च हे स्वीकारले आहे की ते भारताशी युद्ध जिंकू शकत नाहीत. एकीकडे अणुयुद्धाच्या वल्गना करताना इम्रान म्हणाले की, पाकिस्तान भारताशी पारंपरिक युद्ध हरू शकतो, पण याचे परिणाम मात्र गंभीर होतील.
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत इम्रान यांना अणुयुद्धाच्या धोक्याबाबत विचारण्यात आले, तेव्हा ते म्हणाले की, मी असे म्हटलेय की पाकिस्तान कधीही अणुयुद्धाची सुरुवात करणार नाही. मी एक शांतताप्रिय व्यक्ती आहे. मी युद्धाच्या विरोधात आहे. युद्धाने समस्या सुटणार नाहीत असे मला वाटते. युद्धाचे अनपेक्षित परिणाम दिसतात. व्हिएतनाम, इराकमध्ये युद्धाचे गंभीर परिणाम दिसत आहेत.
पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी पुढे सांगितले, जेव्हा दोन अण्वस्त्रसंपन्न देश पारंपरिक युद्ध करतात, तेव्हा ते युद्ध अण्वस्त्राने संपण्याची शक्यता असते. जर पाकिस्तान भारताशी पारंपरिक युद्धात हरत असेल, तर देशाकडे दोन पर्याय असतील. एक शरण येणे किंवा स्वातंत्र्यासाठी अखेरच्या श्वासापर्यंत लढणे. अशा वेळी पाकिस्तान अखेरपर्यंत लढेल आणि जेव्हा कोणी अण्वस्त्रसंपन्न देश असा लढतो, तेव्हा त्याचे गंभीर परिणाम होतात.