पैसे न दिल्यास बदनामीची धमकी
पनवेल : वार्ताहर
पनवेल परिसरातील आदई गावातील एका इमारतीत राहणार्या फिर्यादीच्या पत्नीचे फेसबुक अकाऊंट हॅक करण्यात आले. त्यावरील फोटो अश्लिल फोटो बनवून अकाऊंटवरील क्रमांकावर तो फोटो पाठविण्यात आला. त्यानंतर बदनामी करण्याची धमकी देऊन महिलेकडून हॅकरने खंडणीची मागणी केली. म्हणून खांदेश्वर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फेसबुक अकाऊंट हॅक करून त्यांची वैयक्तिक माहिती, फोन नंबर चोरणे, चुकीची माहिती प्रसिद्द करणे, पैशाची मागणी करणे असे प्रकार सध्या समोर येत आहेत. खांदेश्वर परिसरात अशीच घटना घडली आहे. फिर्यादी (रा. आदई) हा फायनान्समध्ये सेल्स मॅनेजर म्हणून काम करीत आहे. फिर्यादीच्या पत्नीच्या फेसबुक अकाऊंअ हॅक करून त्यावरील अपलोड असलेले फोटो क्रॉप करून तो फोटो अश्लिल बनविला. त्यानंतर अकाऊंटवरील व्हॉट्सअॅप क्रमांकावरून फिर्यादीला तो फोटो पाठवून फोन पेद्वारे 2000 रुपयांच्या खंडणीची मागणी केली. खंडणीचे पैसे नाही दिले तर फिर्यादीची पोलिसात तक्रार करेन त्याचबरोबर पत्नीचे अश्लिल फोटो इतरांना पाठवून व्हायरल करून बदनामी करण्याची धमकी दिली व शिवीगाळ केली.
फिर्यादी यांनी खांदेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. भा. दं. वी. कलम 385,500,504, 506,507, तंत्रज्ञान अधिनियम 2000चे कलम 66 की 67, 67 अ प्रमाणे अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.