Breaking News

31 वर्षांचा विक्रम मोडणारा पाऊस

माथ्यावरील रान अशी बिरुदावली असलेलं माथेरान हे रायगड जिल्ह्यातील टुमदार पर्यटनस्थळ असून डोंगरमाथ्यावर उंच हिरवीगार घनदाट वनराई असल्यामुळे येथे प्रतिवर्षी जोरदार पाऊस बरसतो, पण यावर्षी वरुणराजाने माथेरानकरांवर जास्तच मेहेरबानी केली. 27 जूनपासून सुरू झालेल्या पावसाने 15 सप्टेंबरपर्यंत तब्बल सात हजार 71 मिलिमीटरपर्यंत मजल मारली. मागील 31 वर्षांत इतका पाऊस कधीच बरसला नव्हता. हा विक्रमी पाऊस झाल्यामुळे रायगड जिल्ह्यात सर्वांत जास्त पाऊस बरसणारे पहिले शहर बनले आहे.

माथेरान समुद्रसपाटीपासून 2636 फिट म्हणजे 803 मीटर उंचीवर असलेलं प्रसिद्ध पर्यटनस्थळ आहे. मोटार वाहनांना बंदी असल्यामुळे प्रदूषणमुक्त असे हे पर्यटनस्थळ आहे. त्यामुळे येथे जोरदार पाऊस पडणे स्वाभाविक आहे, पण यावर्षी वरुणराजा काही जास्तच बरसला. माथेरानकरांना यावर्षी पाऊस जास्तच त्रासदायक ठरत आहे. सतत पडणार्‍या पावसामुळे पर्यटक संख्या कमी झाली. मिनीट्रेन बंद पडली. सण भरपावसात साजरे केले. जमिनीची धूप जास्त प्रमाणात होऊ लागली. रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली. असे असताना याउलट रायगड जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस पडणारे शहर बनले आहे. 27 जुलै रोजी मुसळधार पडलेल्या पावसामुळे घाटात रेल्वेरूळ मार्गावर पडलेल्या दरडी तसेच काही ठिकाणची रुळाखालील जमीन वाहून गेल्याने नेरळ-माथेरान मिनीट्रेन एका वर्षाकरिता बंद ठेवण्याचा निर्णय मध्य रेल्वे प्रशासनाने घेतला, तसेच अमन लॉज-माथेरान ही शटल सेवा सुरक्षा कारणास्तव बंद ठेवली.

सतत जलधारा बरसत असल्यामुळे मिळेल त्या ठिकाणाहून पाणी जात आहे. मोठ्या प्रमाणात पाऊस बरसल्याने निसर्गाचीसुद्धा हानी होत आहे. जमिनीची धूप होऊन झाडे उन्मळून पडत आहेत. गटाराचे तोंड छोटे असल्याने पाणी रस्त्यावरून वाहून गेल्याने ठिकठिकाणी रस्त्याला चर पडले आहेत.

जोरदार पडलेल्या पावसामुळे संपूर्ण माथेरानमधील रस्त्यांची दुर्दशा झाली. पर्यटनस्थळाकडे जाणार्‍या रस्त्यांची पुरती वाताहत झाली. हे रस्ते बनविण्यासाठी खूप मोठ्या निधीची आवश्यकता लागणार आहे. ‘क’ वर्गाची नगरपालिका असल्यामुळे नगरपालिकेचे उत्पन्न कमी असल्याने या रस्त्याकामी निधी उभा करण्याचे मोठे आव्हान नगरपालिकेसमोर उभे ठाकले आहे.

सतत बरसत असलेल्या पावसामुळे मिनीट्रेन बंद असल्यामुळे दोन किलोमीटर पायी चालत प्रवास करून ये-जा करावी लागते. पर्यायी व्यवस्था नसल्याने पर्यटकांचे हाल होतात, तसेच मुंबई, पुण्याकडे जाण्याकरिता लोकल ट्रेन व एक्स्प्रेस गाड्या रद्द होतात. परिणामी पर्यटकांना खासगी वाहन करून इच्छितस्थळी जावे लागते.जूनपासून 15 सप्टेंबर या चार महिन्यांत फक्त एक लाख 70 हजार पर्यटक माथेरानमध्ये दाखल झाले होते. श्रावण संपल्यावर पावसाचे प्रमाण कमी होते, पण यंदा पावसाने थोडीही विश्रांती घेतली नसून सर्व सण पावसातच साजरे करावे लागले. मिनीट्रेन बंद असल्यामुळे गणेशमूर्ती डोक्यावर घेऊन भरपावसात चालावे लागले. अजूनही सतत बरसत असलेल्या पावसामुळे काही लोक बस्स पुरे आता, असे म्हणू लागले आहेत. माथेरानमध्ये शेती होत नाही. जिथे शेती होते तिथे जा, अशी गार्‍हाणे घातली जात आहेत, पण माथेरानचे पर्यावरण आबाधित ठेवल्यामुळे रायगड जिल्ह्यात सर्वाधिक पावसाची नोंद

माथेरानमध्ये झाल्याने काहींनी समाधानदेखील व्यक्त केले आहे.

-संतोष पेरणे

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply