ऐतिहासिक परंपरा, भौगोलिक अनुकूलता, नैसर्गिक संपन्नता आणि विविधतेतील एकता अशी अनेक वैशिष्ट्ये असलेला आपला भारत देश जगाला हेवा वाटावा असाच आहे, मात्र असे असूनही आपल्या देशाला जागतिक स्तरावर हवा तसा मान-सन्मान मिळत नव्हता. किंबहुना भारताला नेहमीच दुय्यम स्थान मिळत असे. आज जगभरात भारताच्या यशाचे, विकासाचे अन् प्रगतीचे गोडवे गायले जात आहेत. ही किमया भारतमातेच्याच एका सुपुत्राने करून दाखविली, ज्याचे नाव आहे नरेंद्र दामोदारदास मोदी. सर्वसाधारणपणे एखाद्या देशाच्या नावावरून तेथील पंतप्रधानाची ओळख होत असते, परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या कार्यातून देशाला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले आहे.
नरेंद्र मोदी हे नाव एव्हाना भारतच नव्हे; तर संपूर्ण जगात परिचित झाले आहे. काही अपवाद वगळता गेली सहा दशके केंद्रात व अनेक राज्यांत सत्तेवर राहिलेला आणि संपूर्ण देशात फोफावलेला काँग्रेस पक्ष ‘मोदी लाटे’त अक्षरश: वाहून गेला. सत्तांतरानंतर पंतप्रधान मोदींनी भ्रष्टाचारमुक्त व वेगवान कारभाराने देशवासीयांची मने जिंकली. सब का साथ, सब का विकास या नीतीने जात-पात, धर्म-पंथ या सर्व घटकांना न्याय दिला, तसेच देशवासीयांमध्ये नवा विश्वास व उत्साह निर्माण केला.
पंतप्रधान मोदींनी जन धन योजना, संसद आदर्श ग्राम योजना, सुकन्या समृद्धी योजना, मुद्रा योजना, उजाला योजना, अटल पेन्शन योजना, किसान सन्मान योजना, कौशल्य विकास योजना, उज्ज्वला योजना, आवास योजना, जन आरोग्य योजना यांसारख्या योजनांद्वारे देशातील जनतेचे जीवनमान सुकर करण्याचा, उंचाविण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. त्याचवेळी मेक इन इंडिया, स्कील इंडिया, स्टार्ट-अप, स्टँड-अप या उपक्रमांद्वारे उद्योजकांना विशेषत: युवकांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले.
आपला सख्खा शेजारी आणि कट्टर शत्रू पाकिस्तान आजवर आपल्याला खूप त्रास देत आला आहे. विशेषत: काश्मीर खोर्यात वारंवार हल्ले करून पाकपुरस्कृत दहशतवाद्यांनी अनेक वर्षे कहर माजवला. यामध्ये आपले अनेक जवान शहीद झाले, तर नागरिकांचाही हकनाक बळी गेला. अशा या कुरापतखोर पाकिस्तानला कणखर नेतृत्व पंतप्रधान मोदींनी चांगलाच धडा शिकवला. उरी हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने केलेला सर्जिकल स्ट्राइक, पुलवामा हल्ल्यानंतरचा एअर स्ट्राइक ही मोदींच्या मुत्सद्दीपणाची ठळक उदाहरणे आहेत. मागच्याच महिन्यात जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवून मोदींनी ‘मास्टर स्ट्रोक’ लगावला. अशा सर्वस्पर्शी व उत्तुंग कार्य करणार्या नेत्याला जनतेने दुसर्यांदा संधी दिली नसती तरच नवल. मागच्या वेळपेक्षा जास्त यश यंदा भाजपला मिळाले आणि मोदी पुन्हा पंतप्रधानपदी विराजमान झाले.
अफाट ताकदीच्या जोरावर आपला भारत देश महासत्तेच्या दिशेने वाटचाल करीत आहे. याचे श्रेय पंतप्रधान मोदींनाच जाते. आज संपूर्ण जगात मोदींचा आणि भारताचा डंका वाजतोय. देशाप्रति आणि एकूणच मानवजातीसाठी दिलेल्या योगदानाबद्दल अनेक देशांनी मोदींना त्यांच्या सर्वोच्च पुरस्कारांनी गौरविले आहे. अशा या नवभारताच्या विकासपुरुषाला वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!
-समाधान पाटील