कर्जत : बातमीदार
पेस्टल सोसायटी ऑफ अमेरिका या संस्थेच्या न्यूयॉर्क येथे भरविण्यात आलेल्या 47व्या वार्षिक अंतरराष्ट्रीय चित्र प्रदर्शनात कर्जत येथील चित्रकार पराग बोरसे यांच्या चित्राचा समावेश आहे. सलग दुसर्या वर्षी या प्रदर्शनासाठी निवड होणारे ते एकमेव भारतीय ठरले आहेत.
न्यूयॉर्कमधील द नॅशनल आर्ट्स क्लबमध्ये भरविण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय चित्र प्रदर्शनात जगातील आघाडीच्या 143 चित्रकारांच्या चित्रांचा समावेश आहे. त्यात पराग बोरसे यांच्याही चित्राची निवड झाली आहे. त्यामुळे सलग दुसर्या वर्षी अमेरिकेत होणार्या जगातील सर्वोत्कृष्ट चित्रांच्या प्रदर्शनात परागचे चित्र दिसणार आहे. यापूर्वीही 2018मध्ये अमेरिकेत झालेल्या पेस्टल सोसायटीच्या प्रदर्शनासाठी पराग बोरसे यांच्या चित्राची निवड झाली होती. गेल्याच वर्षी पेस्टल सोसायटी ऑफ वेस्ट कोस्ट म्हणजेच अमेरिकेतील कॅलिफोर्निया स्थित या कलासंस्थेने पराग बोरसे यांच्या चित्राला त्यांचा सर्वोत्तम समजला जाणारा साऊथ वेस्ट आर्ट मॅगझिन पुरस्कार (मानधन 2300 अमेरिकन डॉलर) देऊन सन्मानितही केले होते. पेस्टल जर्नल या अमेरिकेतून प्रकाशित होणार्या मासिकाने 2013 साली जगातील पहिल्या पाच चित्रकारांमध्ये पराग बोरसेंची निवड केली होती.