Breaking News

आरोग्याविषयी जागरूकता आवश्यक ; आमदार प्रशांत ठाकूर यांचे प्रतिपादन धन्वंतरी संस्थेकडून डॉक्टरांचा सत्कार

खारघर : रामप्रहर वृत्त

हल्ली धकाधकीच्या जीवनात माणसाला विविध रोग, आजार होत असतात. त्यामुळे त्रस्त व्हायला होते. कॅन्सरसारख्या व्याधींमुळे तर जगणे अवघड होऊन बसते, पण अशा असाध्य रोगांवरही निश्चितपणे मात करता येते. यासाठी आरोग्यविषयक जागरूकता आवश्यक आहे, असे प्रतिपादन धन्वंतरी आरोग्यदूत सेवा संस्थेचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी रविवारी (दि. 7) येथे केले.

1 जुलै हा दिवस राष्ट्रीय डॉक्टर्स डे म्हणून साजरा केला जातो. यानिमित्ताने अनेक ठिकाणी विविध उपक्रम आयोजिले जातात. त्याच अनुषंगाने सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या संकल्पनेतून स्थापन झालेल्या धन्वंतरी आरोग्यदूत सेवा संस्थेच्या वतीने कॅन्सर रुग्णांची सेवा करणार्‍या व इतर रुग्णसेवा देणार्‍या डॉक्टरांचा सत्कार सोहळा खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलच्या सभागृहात आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी ते बोलत होते.

या कार्यक्रमास पनवेलच्या महापौर व संस्थेच्या उपाध्यक्ष डॉ. कविता चौतमोल, महिला व बालकल्याण सभापती लीना गरड, नगरसेवक अभिमन्यू पाटील, डॉ. अरुणकुमार भगत, नीलेश बावीस्कर, रामजी बेरा, नगरसेविका नेत्रा पाटील, अनिता पाटील, भाजप शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल, डॉ. ययाती गांधी, अग्निहोत्री, गीता चौधरी आदींसह विविध संस्थांचे प्रतिनिधी आणि डॉक्टर उपस्थित होते.

वर्षाचे 365 दिवस डॉक्टर आपली सेवा देतात. रुग्णाच्या कलकलाटाकडे लक्ष न देता ती व्यक्ती कशी बरी होईल यासाठी ते झटत असतात. कोणताही त्रागा न करता ते योगदान देतात. त्यांच्या या कार्याची दखल घेण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केल्याचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगितले. आज या मंडळींनी स्वतःच्या सन्मानाबद्दल न बोलता ते पुढे काय करणार आहेत आणि तुम्ही-आम्ही काय करायचे याबद्दल सांगितले. असे हे डॉक्टर सेवाव्रती म्हणून काम करीत असल्याने समाजाचे स्वास्थ्य राखण्यास मदत होते, अशा शब्दांत त्यांनी डॉक्टरवर्गाचा गौरव केला.

आपल्या भाषणात आमदार प्रशांत ठाकूर यांनी दिवंगत डॉ. प्रभाकर गांधी यांचा आवर्जून उल्लेख केला. स्वतःच्या पेशात न गुरफटता त्यांनी समाजासाठी योगदान दिले. प्रसंगी पदरमोड करून रुग्णांना आर्थिक मदत केली. एवढेच नव्हे; तर मी व माझ्या कुटुंबापुरता मर्यादित न राहता त्यांनी अनेक अंगांनी समाजाची सेवा केली, असे त्यांनी नमूद केले.

डॉक्टर हे माणसाला आयुष्यात उभे करण्याचा प्रयत्न करतात. त्यांची चिंता पळवून लावतात, मात्र अलीकडे काही जण त्यांच्या दोषाकडे बोट दाखवत असतात असे सांगून, डॉ. गुणे यांच्यासारखे देवदूत कमीत कमी फी घेऊन दर्जेदार सेवा देतात. कुठे साथीचे रोग, वैद्यकीय आपत्ती आली की मदतीसाठी धावून येतात. सेवाभावी संस्थांच्या माध्यमातूनही ते समाजासाठी कार्यरत असतात, याकडे आमदार प्रशांत ठाकूर यांनी लक्ष वेधले.

वडाची पारंबी जमिनीत जाऊन नवे झाड तयार करीत असते. तशाच प्रकारे आपल्यातील चांगुलपणा वाढवून सर्व जण मिळून आरोग्य क्षेत्रात काम करू या, असे आवाहन आमदार प्रशांत ठाकूर यांनी भाषणाच्या शेवटी केले. कार्यक्रमासाठी दिलीप जाधव, मोना अडवाणी, अग्निहोत्री यांचे सहकार्य लाभले.

– यांचा झाला सन्मान

या कार्यक्रमात गिरीश गुणे, सलील पाटकर, पुष्पक चिरमाडे, निशांत काठाळे, शुभदा नील, कीर्ती समुद्र, समिधा गांधी, प्राची काठाळे या डॉक्टरांचा आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

– ‘तीन चम्मच कम, चार कदम आगे’. म्हणजेच जेवणात तीन चमचे कमी खा. एक साखर, दुसरे तेल आणि तिसरे म्हणजे मीठ. या तीन गोष्टी कमी करून नियमित चालत जा.

-डॉ. गिरीश गुणे

ज्या खायच्या गोष्टी असतात त्या नॅचरल असतात. ज्या वेळी डाएटच्या क्वॉन्टिटीवर नियंत्रण नसते, त्या वेळी रोग उद्भवतात. तेव्हा खाण्याबाबत नियमन करा.

-डॉ. सलील पाटकर

Check Also

पनवेल कोळीवाड्यात आई एकविरा मातेचे तैलचित्र, सभामंडप, सेल्फी पॉईंटचा शुभारंभ; मान्यवरांची उपस्थिती

पनवेल : रामप्रहर वृत्त आई एकविरा मातेचे तैलचित्र, सेल्फी पॉईंट आणि सभामंडप पनवेल कोळीवाड्याची शान …

Leave a Reply