Breaking News

प्रत्येक घरात पाणी पोहचले पाहिजे

अ‍ॅड. महेश मोहिते यांची अधिकार्‍यांना बैठकीत सूचना; 26 गाव पाणीपुरवठा योजना

रोहे ः प्रतिनिधी

तालुक्यातील 26 गाव पाणीपुरवठा योजनेत समाविष्ट असलेल्या सर्व गावांना या योजनेचे पाणी पोहचत नाही, त्याची संबंधित अधिकार्‍यांनी गंभीर दखल घ्यावी. या कामात अडथळे येत असतील, तर पोलीस संरक्षण घेऊन ते दूर करावेत. या पाणीपुरवठा योजनेतील शेवटच्या गावातील प्रत्येक घरात पाणी पोहचले पाहिजे, अशा सूचना अलिबाग विधानसभा मतदारसंघाचे भाजप अध्यक्ष अ‍ॅड. महेश मोहिते यांनी रोहे येथे झालेल्या बैठकीत अधिकार्‍यांना दिल्या. 26 गाव नळपाणी पुरवठा योजनेतून पुरेसा पाणीपुरवठा व्हावा, अशी मागणी या योजनेत समाविष्ट असलेल्या गावांतील ग्रामस्थांनी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती. त्या अनुषंगाने पालकमंत्री चव्हाण यांच्या सूचनेनुसार रोह्यातील शासकीय विश्रामगृहात ग्रामस्थ, लोकप्रतिनिधी व अधिकारी यांची बैठक घेण्यात आली. रोहा समन्वय समिती अध्यक्ष संजय कोनकर, भाजप नेते नवनीत डोलकर, उत्तम नाईक, भातसई सरपंच गणेश खरीवले, निडी तर्फे अष्टमी ग्रामपंचायत सदस्य वैभव चोरगे, मोतीराम गीजे, धर्मा ठाकूर, दिलीप म्हात्रे, अरुण वाघमारे, कोळी महासंघाचे तालुका अध्यक्ष सूर्यकांत वाघमारे, सचिन चोरगे, रत्नदीप चावरेकर, महेंद्र चोरगे, राहुल चोरगे, एमजीपी उपविभागीय अभियंता पांडुरंग डोईफोडे, शाखा अभियंता सी. जी. महाकाळे, एमआयडीसीचे धाटाव उपअभियंता मालोजी निंबाळकर, सहाय्यक अभियंता बी. एस. म्हसदे यांच्यासह संबंधित अधिकारी, लोकप्रतिनिधी व ग्रामस्थ या बैठकीला उपस्थित होते. अधिकार्‍यांच्या हलगर्जीपणामुळे या योजनेतील जलवाहिनीतून अनधिकृत पाणी घेतले जात आहे. त्यामुळे आम्हाला पाणी मिळत नाही. हे पाणी आमच्या हक्काचे आहे, ते आम्हाला मिळालेच पाहिजे, अशी आग्रही मागणी उपस्थित ग्रामस्थांनी या सभेत केली. धाटाव औद्योगिक क्षेत्राकडून 26 गाव पाणी योजनेसाठी तासाला 65 हजार लिटर पाणी सोडले जाते, मात्र प्रत्यक्षात पडम येथे 35 टक्केच पाणी पोहचते, उर्वरित पाणी कुठे मुरते, याचा शोध अधिकार्‍यांनी लावावा व या योजनेतील अडथळे दूर करून आम्हाला सुरळीत पाणी पुरवठा करावा, अशी मागणी वैभव चोरगे, मोतीराम गिजे, नवनीत डोलकर, उत्तम नाईक, धर्मा ठाकूर आदी ग्रामस्थांनी केली.

या योजनेतून ग्रामस्थांना योग्यरीत्या पाणी वाटप झाले पाहिजे. त्यासाठी अधिकार्‍यांना जे सहकार्य लागेल ते मिळेल. अधिकार्‍यांनी  या पाणीपुरवठा योजनेतील अडथळे दूर करण्याच्या कामाला लागावे.

-अ‍ॅड. महेश मोहिते, अध्यक्ष, अलिबाग विधानसभा मतदारसंघ भाजप

26 गाव पाणी योजनेतून सर्व गावांना सुरळीत पाणीपुरवठा करण्याच्या सूचना एमजीपीला दिल्या होत्या. त्यात अडथळे येत असतील, तर एमजीपीने अहवाल द्यावा, त्यासंबंधी योग्य ती कारवाई करण्यात येईल.

-कविता जाधव, तहसीलदार, रोहा

Check Also

रायगड तायक्वांडो असोसिएशनतर्फे बेल्ट परीक्षा उत्तीर्ण, आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा गौरव

आमदार प्रशांत ठाकूर यांचा विशेष सत्कार पनवेल : रामप्रहर वृत्तरायगड तायक्वांडो असोसिएशनच्या वतीने बेल्ट परीक्षेत …

Leave a Reply