Breaking News

जिल्ह्यातील बंदरे रुतताहेत गाळात

भाऊचा धक्का मुंबई – अलिबाग मांडवा रो-रो सेवा  चालवणे किती खर्चीक आहे हे आता सिद्ध होऊ लागले आहे. मागील वर्षी ही रो-रो सेवा सुरु झाली. रो-रो सेवा सांभाळणार्‍या एमटुएम मेरिटाईमची बोट बंदरात व्यवस्थित नांगरता यावी, यासाठी पुन्हा गाळ काढला जात आहे. सध्या मांडवा येथे गाळ काढण्याचे काम सुरु आहे. या बंदरातील गाळ काढण्यावर खर्च केला जातोय. मात्र जिल्ह्यातील इतर बंदरे गाळाने भारतायत त्याकडे मात्र दुर्लक्ष केलं जातंय. सागरमाला, नीलक्रांती प्रकल्पांतर्गत दुर्लक्षीत राहिलेली रायगड जिल्ह्यातील लहान-मोठी बंदरे पुन्हा विकसीत केली जात आहेत. 1989मध्ये सुरु झालेल्या जेएनपीटी बंदरातून देशाच्या एकूण कंटेनर हाताळणीपैकी 55टक्के कंटेनरची चढ-उतार होते. या बंदराने देशाच्या आयात – निर्यातीत मोलाचा वाटा उचललेला असल्याने अन्य मृतावस्थेत असलेल्या बंदरांनाही नव्याने संजीवनी देण्याचे प्रयत्न सुरु झाले आहेत. यातील पहिला प्रकल्प म्हणजे राजपूरी खाडीतील दिघी आणि आगरदंडा बंदर. बंदरे बांधण्याचे काम पंधरा वर्षापूर्वी सुरु करण्यात आले, मात्र ते अद्याप पूर्ण झालेले नाही. दिघी बंदरातूनही काही प्रमाणात मालवाहतूक सुरू झाली आहे. आगरदंडा बंदरासह दिघी बंदर पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यास रायगड हा देशातील सर्वात जास्त व्यावसायिक जलवाहतूक करणारा जिल्हा ठरेल. माल वाहतुकीबरोबरच प्रवासी वाहतूक हा येथील जलवाहतुकीचा मुख्य भाग आहे. मुंबई-मांडवा, भाऊचा धक्का-रेवस, करंजा-रेवस या मार्गावर प्रवासी वाहतूक सुरू आहे, तर साळाव बंदर, काशिद रो-रो सेवा, राजपुरी-दिघी बंदरांचा विकासीत करण्याची शासनाची योजना आहे. या सर्व प्रकल्पांमुळे रायगड जिल्ह्याला सागरी वाहतुकीचे गतवैभव मिळणे शक्य आहे. परंतु या बंदरांची सध्या दुरवस्था झालेली आहे. अनेक बंदरे सतत वाहून येणार्‍या गाळात रुतलेली आहेत. तेथे जेट्ट्या बांधाव्या लागणार आहेत, बंदरांपर्यंत जाणारे रस्ते विकसीत करावे लागतील आणि यासाठी करोडो रुपयांचा निधी आणावा लागेल. कोकणाला जलवाहतुकीचा मोठा इतिहास आहे. विशेषतः रायगड जिल्ह्यातील या ऐतिहासिक बंदरांचा उल्लेख परदेशी प्रवाशांनीही आपल्या प्रवास वर्णनात केला आहे. इ.स.पूर्व 500 ते इ.स.250 पर्यंत चौल, महाड, राजपुरी या बंदरांमधून पर्शिया, ग्रीस, अरेबिया, येमेन आणि इजिप्तबरोबर आयात- निर्यात व्यापार होत असे. परदेशी व्यापाराबरोबर चौल, महाड, मांदाड, राजपुरी व गोरेगाव (घोडेगाव) या बंदरातून मालाची मोठ्या प्रमाणात चढ – उतार होत असे. ही बंदरे सह्याद्रीच्या पूर्वेकडील जुन्नर, नाशिक व पैठणसारख्या व्यापारी केंद्रांशी बोरघाट, देवस्थळी, कुंभा व शेवट्या घाट मार्गांनी जोडलेली होती. उत्तर कोकणात बंदरांच्या सान्निध्यात असलेल्या व्यापारी केंद्रांजवळ बौद्ध धर्मियांच्या त्यावेळी वसाहती होत्या. ते कुडे, पाले, कोल, चौलजवळील बौद्ध लेण्यांवरून दिसून येते. या बंदरांव्यतिरिक्त म्हसळा आणि सध्या पेण तालुक्यात असणारे अंतोरे ही बंदरेसुद्धा तत्कालीन आयात-निर्यात व्यापाराकरिता प्रसिध्द होती. या बंदरातून चालणार्‍या व्यापारावर येथील अर्थव्यवस्था अवलंबून होती. परंतु ही बंदरे गाळात रुतल्यामुळे ती दुर्लक्षित राहिली आहेत. कोकणात पर्यटन व्यवसायाला चालना देण्यासाठी जल वाहतूक महत्वाची आहे. म्हणूनच भाऊचा धक्का ते मांडावा अशी रो-रो सेवा सुरु करण्यात आली. मागील वर्षी ही सेवा सुरु झाली. एका वर्षाच्या आतच या बंदरात गाळ साचू लागलाय. सध्या येथे गाळ काढण्याचे काम सुरु आहे. मांडवा बंदरात मोठ्या प्रमाणात गाळ साचतो. त्यामुळे येथे बॅकवाटर करू नये, असे स्थानिक कोळी बांधव सांगत होते. त्यांचे म्हणणे ऐकले नाही. त्यामुळे या बंदरातील गाळ काढण्यासाठी करोडो रुपये खर्च केले जात आहेत. यापूर्वी 16 कोटी 54 लाख 2 हजार 510 इतके बिल फक्त गाळ काढण्यासाठी खर्ची घालण्यात आलेले असताना आता पुन्हा चार कोटी 53 लाख रूपये खर्च करुन गाळ काढण्यास सुरुवात झाली आहे. रो-रो सेवा संभाळणार्‍या एमटुएम मेरिटाइमची बोट बंदरात व्यवस्थित नांगरता यावी, यासाठी पुन्हा गाळ काढला जात आहे. रो-रोच्या ट्रॅकमधीलच खोली वाढवली जात आहे, त्याचा छोट्या बोटींना काहीही उपयोग होत नसून एमटुएमची भली मोठी बोट बंदरात येताना जो गाळ उडतो, तो जुन्या जेट्टीच्या बाजूला जाऊन बसत असतो. मांडवा बंदरातील जेट्टीच्या डाव्या बाजूला गाळाची उंची वाढल्याने ओहटीच्या वेळेला छोट्या बोटीदेखील लागू शकत नाहीत. फक्त उजव्या बाजूलाच एका वेळेला दोन ते तीन बोटी लावता येतात. यामुळे गर्दीच्या वेळी प्रवाशांचा खोळंबा होत आहे.यापूर्वी गाळ काढण्याच्या कामावर केलेल्या खर्चाबाबत साशंकता असल्याने या वेळी तरी गाळ वाहून नेणार्‍या बार्जेसना व्हीटीएस (व्हेसल ट्रॅकिंग सिस्टीम) बसवून त्यांची नोंद मुंबई पोर्ट ट्स्टच्या व्हेसल ट्रॅकींग मॅनेजमेंट सिस्टीम (व्हीटीएस) या यंत्रणेला द्यावी, अशी मागणी केली जात आहे. मात्र, या मागणीकडे दुर्लक्ष केले जात आहे. गाळ काढण्याचा त्रास इतर बोट मालकांसह प्रवाशांना सहन करावा लागत आहे. अन्य प्रवासी वाहतूक करणार्‍या बोटी, ज्या जेटीवर उभ्या राहतात त्या ठिकाणी मात्र गाळ काढला जात नाही. त्यामुळे अनेकदा ओहोटीच्या वेळी बोटीच्या फेर्‍या रद्द कराव्या लागतात आणि प्रवाशांचा खोळंबा होतो. रो-रोमुळे मांडवा बंदरात इतर बोटी लागण्यात मोठी अडचण होत आहे.  मांडवाप्रमाणेच रेवस बंदरातूनदेखील भाऊच्या धक्क्यापर्यंत बोटी जातात. पूर्वी याच मार्गाने बोटी जात असत. परंतु धनिकांसाठी मांडावा बंदर विकसित करण्यात आले. येथे बंदर उभारु नका, असा सल्ला त्या वेळीदेखील देण्यात आला होता. त्याकडे दुर्लक्ष केले गेले. त्याचे परिणाम भोगावे लगत आहेत. दरवर्षी या बंदरातील गाळ काढण्यासाठी करोडो रुपये खर्च केले जात आहेत. हा सर्व खर्च पाण्यात जात आहे. जो खर्च दरवर्षी मांडवा येथील गाळ काढण्यासाठी केला जातोय तेवढा खर्च जिल्ह्यातील इतर छोट्या बंदरातील गाळ काढण्यासाठी केला असता तर त्याचा फायदा पर्यटन वाढीस झाला असता. मांडावा बंदराचा विकास करताना जिल्ह्यातील इतर छोट्या बंदरांकडे दुर्लक्ष करणे योग्य नाही.  रायगड जिल्ह्यातील अनेक  बंदरे वाळूच्या गाळाने भरुन गेली आहेत. आजच्या घडीला महाड, गोरेगाव, रोहा, नागोठणे, अंतोरा  या बंदरात लहान होड्यादेखील येवू शकत नाही. या बंदरातील गाळ काढल्यास जल वाहतूक अधिक वेगवान होईल.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply