कर्जत : बातमीदार
पर्यटकांनी माथेरान परिसरात फेकून दिलेल्या प्लास्टिक बाटल्या आणि कचरा येथील पर्यावरणप्रेमी राकेश कोकळे व त्यांच्या सहकार्यांनी गोळा करून माथेरानचा काही भाग प्लास्टिकमुक्त करण्याचे काम केले आहे.
पर्यटन हंगामात हजारो पर्यटक माथेरानला भेट देतात. हे पर्यटक माथेरान आणि परिसरातील जंगलात मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक आणि प्लास्टिकच्या बॉटल्या टाकून देतात. पर्यावरणप्रेमी राकेश कोकळे व त्यांचे सहकारी दरवर्षी स्वच्छता मोहीम राबवून हा कचरा गोळा करतात.
सध्या माथेरानचा पर्यटन हंगाम संपला आहे. या हंगामातही पर्यकांनी परिसरातम मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक बाटल्याआणि प्लास्टिकचा कचरा फेकून दिला होता. माझं गावं माझं पर्यावरण या संकल्पनेतून राकेश कोकळे यांनी माथेरानचे अधीक्षक दिक्षांत देशपांडे, प्रकाश मोरे, किशोर कासुरडे, दीपक रांजणे, राजू जाबरे, गणेश बिरामने, अर्जून जानकर, अनिकेत कोकरे, पंकज कोकरे, जितेश कदम, अनंता ओखारे, विलास चव्हाण, शुभम सकपाळ, अक्षय नाईकरे, करण जानकर आदी सहकार्यांच्या मदतीने शारलोट लेक परिसरातील जंगलात फिरून सुमारे 27 गोणी म्हणजे 7 ते 8हजार बिस्लरी बॉटल्स तसेच प्लास्टिक कचरा गोळा केला. व माथेरानचा काही भाग प्लास्टिकमुक्त केला आहे.